आपल्य़ा उर्दू गझल आणि शायरीने लाखो तरुणांच्या गळ्यातले ताईत बनलेले ज्येष्ठ शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचा ११ ऑगस्ट हा पहिला स्मृतिदिन. आपल्या शायरीतून प्रत्येकाला भुरळ घालणारे दिग्गज शायर राहत इंदौरी यांचा जन्म १ जानेवारी १९५० रोजी मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण नूतन स्कूल इंदूर येथे झाले. त्यांनी इस्लामिया करीमिया कॉलेज इंदूर येथून १९७३ मध्ये पदवी तर १९७५ मध्ये बरकतउल्लाह विश्वविद्यालय, भोपाळ येथून उर्दू साहित्यात एम.ए. केले. १९८५ मध्ये मध्य प्रदेशच्या भोज मुक्त विद्यापीठातून उर्दू साहित्यात त्यांनी पीएच.डी.संपादन केली होती. ते एक नावाजलेले शायर तर होतेच, याशिवाय कवि आणि गीतकारही होते.
त्यांनी बॉलिवूडसाठीही अनेक गाणी लिहिली असून आज हमने दिल का हर किस्सा (सर), चोरी चोरी जब नजरे मिली (करीब), ये रिश्ता क्या कहलता है (मीनाक्षी), धुआ धुआ (मिशन काश्मीर), दिल को हजार बार (मर्डर) आदी अनेक अर्थपूर्ण गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. ऋत, मौजूद, नाराज अशा पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले असून ते उर्दू साहित्याचे अभ्यासक तर एक उत्तम वक्ते देखील होते. त्यांच्या “वो बुलाती है, मगर जाने का नही” या शायरीने धुमाकूळ घातला होता. इंदौरी केवळ साहित्य आणि कलेतच माहीर होते असे नाहीतर शालेय जीवनात ते फुटबॉल आणि हॉकी संघाचे कर्णधारही होते. वयाच्या १९ व्या वर्षी कॉलेजमध्ये आपली पहिली शायरी ऐकविणाऱ्या इंदौरींची प्रचंड मेहनत, क्षमता आणि शब्दकौशल्य रसिकांच्या हृदयावर कायम गारुड करील, यात शंका नाही. त्यांचे काही गाजलेले शेर …
रोज़ तारों को नुमाइश में ख़लल पड़ता है
चाँद पागल है अँधेरे में निकल पड़ता है
किसने दस्तक दी ये दील पर…कौन है,
आप तो अंदर है,फिर बाहर कौन है ।
राज जो कुछ हो इशारो में बता भी देना
हाथ जब भी दो जरा दबा भी देना
स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली.
प्रा. विजय कोष्टी,
कवठे महांकाळ, (जि. सांगली).
Leave a Reply