नांदेड – आई ही बालकाची प्रथम गुरु असते. घरातच ती आपल्या बाळाला वेगवेगळ्या माध्यमातून शिकवते. बाबासुद्धा विविध कृती आणि कौशल्याचे ज्ञान आपल्या पाल्यांना देतात. शाळा व पालक यांच्या समन्वयातून गृह आधारित शिक्षण उपयुक्त ठरते आहे. शाळा बंद असतांना शिक्षक पालकांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या आई बाबांची शाळा या उपक्रमामुळे मुले शैक्षणिक प्रवाहात आली आहेत, अशी सकारात्मक भूमिका या उपक्रमाचे तालुका समन्वयक तथा विषयतज्ज्ञ संजय अकोले यांनी जवळा देशमुख येथे घेण्यात आलेल्या आई – बाबांची शाळा या कार्यक्रमात मांडली. यावेळी मंचावर केंद्रप्रमुख अमीन पठाण, मुख्याध्यापक ढवळे जी. एस., विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे हे होते.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड तथा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीमुळे शाळा बंद असलेल्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत आई-बाबांची शाळा हा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. जवळ्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या उपक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पालक संवाद कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी लोहा समन्वयक संजय अकोले आणि केंद्रप्रमुख अमीन पठाण यांनी सविस्तर मार्गदर्शन करुन पालकांशी संवाद साधला. संतोष अंबुलगेकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सर्व पालकांना संपूर्ण आराखडा समजावून देण्यात आला. पालक शेरखान पठाण, मिलिंद गोडबोले, आनंद गोडबोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कार्यशाळेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुलभक संतोष घटकार यांनी केले तर आभार मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी मानले. अध्यक्षीय समारोप शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे यांनी केला. आई बाबांची शाळा या उपक्रमात अधिक लक्ष घालणार असल्याची पालकांनी ग्वाही दिली. कार्यशाळेत रतन टिमके, मनिषा गच्चे, गुणवंत गच्चे, प्रतिभा गोडबोले, बाबुमियाँ शेख, संभाजी गवारे, सुषमा गच्चे, गंगाधर शिखरे, मारोती चक्रधर, भीमराव गोडबोले, मालनबाई शिखरे, चंदरबाई शिखरे, गंगासागर शिखरे, अंजली कदम, श्रुती मठपती, हैदर शेख, दत्ता गोडबोले, आप्पाराव शिखरे, अरविंद गोडबोले, संघर्ष गच्चे, नंदा गोडबोले, बालाजी पांचाळ, अमोल गोडबोले, माया गोडबोले, भानुदास पवार, बंडू पवार, नंदकुमार ससाणे, रवी गच्चे यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेला इयत्ता पहिली व दुसरीच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
Leave a Reply