ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मूल्यांतराचा वस्तूपाठ घालून देणारी तमासगिरीण : नामचंद पवळा

August 11, 202122:10 PM 128 0 0

स्वातंत्र्यपूर्व कालखंडात तमाशाद्वारे महाराष्ट्राची लोकसंख्या ज्या अत्युच्च शिखरावर विराजमान झाली त्या इतिहासाच्या शिरपेचात आद्यनृत्यांगणा पठ्ठे बापुरावाची नामचंद पवळा या नर्तिकेच्या नावाचा तुरा अग्रभागी सजवावा लागेल. कारण पवळाने केवळ लावण्यांवर नृत्यच केले नाही, आपल्या आरस्पानी सौंदर्याने रसिकप्रेक्षकांना घायाळच केले नाही तर पठ्ठे बापूराव नावाच्या या रेठऱ्याच्या श्रीधरपंत कुलकर्ण्याला भालेराव बनविले. ब्राम्हणाला महार बनविण्याची मूल्यांतर व्यवस्थेची खेळी पवळाने यशस्वीरित्या खेळली. महारांनी बौद्ध धम्म स्विकारुन मूल्यांतर घडवून आणणारी क्रांती डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाली. परंतु पवळाने पठ्ठे बापूरावांत जे मूलगामी परिवर्तन घडवून आणले होते, ते तत्कालीन कर्मठ धर्मविद्वानांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडलेले नव्हते. या सगळ्या जीवनक्रमांचा धांडोळा घेतला तर सर्वोत्तम गुणसंपन्न महार लोकांनी पवळाचा आदर्श घेऊन वाटचाल करायला हवी होती. ह्या प्रक्रियेच्या प्रारंभाला १९५६ हे साल उजडावे लागले. त्यानंतर काही प्रमाणात जातीअंताच्या प्रयत्नाला यश आले. हे प्रयत्न पुढे जास्त काळ टिकून राहू शकले नाहीत. जातीअंताचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक माध्यमे आहेत. पवळाने तमाशाच्या फडातून ही किमया साधली होती. ही ऐतिहासिक घटना इतिहासाच्या कपाळावर सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहे.


महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरगांव येथे १२ आॅगस्ट १८७० रोजी एका महार घराण्यात पवळाचा जन्म झाला. नृत्य हे तिच्या रक्तात जन्मजात होते. त्यामुळे तिचे देवाशी लग्न लावून दिले गेले. पवळा ’खंडोबाची मुरळी’ झाली. नंतर हरिबाबा घोलप नावाच्या एका गृ्हस्थाच्या तमाशात पवळा काम करू लागली. तो तमाशा बंद पडल्यावर पवळा नामा धुलवडकराच्या तमाशात गेली. पवळाच्या पायात जणू नृत्याची बिजली कडाडत होती होती. तिचा गळा मुळातच अतिशय गोड होता. तिचे अप्रतिम सौंदर्य, तिची नृत्यकला आणि तिचा गोड गळा यावरून लोक तिला ’नामचंद पवळा’ म्हणू लागले. नामा धुलवाडकर यांच्या तमाशात पवळा पहिल्यांदा नाचली. पवळासारखी रूपवान स्त्री नाचताना पाहून प्रेक्षक फिदा व्हायचे. पवळाने आपल्या नृत्याने तमाशात नवी क्रांती केली. पवळाच्या रूपाने तमाशात नाचनारीण म्हणून स्त्रीचा समावेश झाला होता. तमाशात केवळ तरुण मुलेच स्त्रियांचा वेष करून नाचगाणे करायचे. पवळाच्या रूपाने खरोखर सुंदर दिसणारी, छान नाचणारी तरुण मुलगी तमाशात आल्याने हरिबाबा घोलपांच्या तमाशाची कीर्ती सगळीकडे पसरली. लोकप्रियतेच्या शिखरावर असतांना हरिबाबा घोलप यांना या सगळ्याचा कंटाळा आला आणि त्यांनी विरक्ती पत्करली आणि कीर्तने करू लागले. यानंतर पवळाने कोल्हारच्या कडू सुभान्या लोखंडे व इतर एक दोन तमाशात काम केले.
नामा धुलवडकर यांच्या तमाशात काम करीत असताना हा तमाशा मुंबईत आला. मुंबईत पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, दगडूबा साळी, शिवा संभा कवलापुरकर, शंकरराव अवसरीकर आदींचे तमाशे गाजत होते ; पण या सगळ्या तमाशात तरुण मुलेच स्त्री वेशात नाचायची. जेव्हा मुंबईत बातमी पसरली की नामा धुलवडकर यांच्या तमाशात खरीखुरी स्त्री नाचते तेव्हा या तमाशाला मोठी गर्दी होऊ लागली. गर्दी इतकी वाढली की नामा धुलवडकरांसारख्या तमासगीराला गुंड प्रवृत्तीच्या प्रेक्षकांपासून लावण्यवती पवळाला सांभाळणे कठीण जाऊ लागले. अखेरीस धुलवडकरांनी तमाशा बंद केला आणि पवळा पठ्ठे बापुरावांच्या तमाशात गेली. नामा धुलवडकराचा तमाशा फुटल्यावर पवळा, पठ्ठे बापूराव यांच्या तमाशात आली. पवळा आणि बापूराव यांचा संगम हा बापूरावांच्या प्रतिभेच्या परमोत्कर्षास कारणीभूत झाला. आणि त्याचवेळी बापूराव ‘बाटले!’ त्यांना हद्दपार का करू नये अशी लोकांत चर्चा सुरू झाली. रोज मारामाऱ्या होऊ लागल्या आणि शेवटी पठ्ठे बापूराव आणि पवळा यांना कोर्टाचे बोलावणे आले. न्यायाधीशाने बापूरावांना ’तुम्ही बाटलांत का’ असे विचारले. या प्रश्नाचे उत्तर मी आपणास तमाशाच्या फडात देतो असे म्हणून त्याच्या उत्तरासाठी बापूरावांनी कोर्टातल्या ज्यूरींना आपल्या तमाशाचे आमंत्रण दिले. ज्यूरी तमाशाला आले आणि बापूरावांनी कवन सुरू केले.

श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनी, सोवळे ठेवले घालुन घडी
मशाल धरली हाती तमाशाची, लाज लाविली देशोधडी
कलीयुगाचा ऐका दाखला, पठ्ठे बापुराव भुलला पवळिला
महारिणीसाठी महार झाला पुन्हा जात मिळेल का हो त्याला
ब्राह्मणाला हो जी जी ॥

पठ्ठेबापूराव आणि पवळाच्या जातीपातीचा निवाडा करण्यासाठी साक्षात कोर्ट पठ्ठे बापूरावांच्या तमाशाला आले होते. त्यावेळी मोठा जनसमुदाय हजर होता. बापूरावांनी स्टेजवर स्वतःचे जीवन-चरित्र सांगितले. ११-१०-१९०५ हा तो ऐतिहासिक दिवस. बापूराव कोर्टापुढे नतमस्तक होत शेवटी म्हणाले, ‘ब्राह्मणाचे महार होता येईल; पण महाराचा ब्राह्मण होता येणार नाही. नामचंद पवळाने मला महार होण्याची अट घातली आणि ती मी मान्य केली. हे फक्त जाणते लोकच जाणतील. मग मी आता महार झालो आहे, तो ठीक आहे.’ कोर्टाने बापूराव आणि पवळाला निर्दोष सोडले. पुढे परत त्यांचा तमाशाचा फड सुरू झाला. पवळा आणि पठ्ठे बापूराव या जोडीने तमाशाला नवे वळण दिले.‌ बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली. १८९० ते १९०० या काळात पठ्ठे बापूराव प्रत्यक्ष तमाशा फडात उभे राहिले. त्यांनी तमाशात ‘रंगबाजी’ नावाचा स्वतंत्र प्रकार आणला.‌ त्या काळातील नाटकांच्या प्रभावातूनच पठ्ठे बापूरावांनी रंगबाजीचे लेखन केले. १९१४ ते १९१८ च्या काळात महायुद्ध आणि तापसरी मंदीच्या लाटेत नाट्यसृष्टी हेलकावत होती. अनेक तमासगीर महाराष्ट्राच्या खेडोपाडी जत्रा, यात्रांमधून तमाशा सादर करून तग धरून होते. पठ्ठे बापूरावांनी याच काळात आपली लोकप्रियता कायम ठेवली. त्या काळात तमासगीर आपल्या जातीपातीचा मोठ्या गौरवाने उल्लेख करीत असत. जातीअंताच्या लढ्यासाठी लढलेला पहिला साहित्यिक’ असा पठ्ठे बापूरावांचा गौरव अनेकवेळा विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांनी केला होता. जाती-जातीच्या संघर्षाचे चटके पठ्ठे बापूरावांनी सहन केले आणि कवनांमध्ये आपल्या ब्राह्मण श्रेष्ठ वर्णाची महती गातानाच अस्पृश्य पवळाच्या हातचा घास खाल्ला. तो जाहीररीत्याही खाल्ला. त्यासाठी प्रखर सामाजिक विरोधाचा सामना केला.


बापूरावांची काव्य प्रतिभा पवळाच्या सान्निध्यातच खऱ्या अर्थाने बहरली. बापूरावांचे काव्य पवळा बाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याविष्काराने रसिकांच्यासमोर सादर होत होते. बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पसरली होतीच. १९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर त्यांनी `मिठाराणी’ चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला. पण पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करुन स्वत:चा लिलाव केला. मुंबईच्या अबू शेठनी हा लिलाव खरेदी केला. मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. दोन आण्याच्या तिकिटावर दररोज चारशे रुपयांचा गल्ला जमत असे. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्‍या स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. पवळेच्या हेकेखोरपणाने हा तमाशाचा संसार मोडल्याचे अनेक जण सांगतात. बापुराव खर्चिक असल्यानेही ती त्यांना सोडून गेल्याचे सांगितले जाते. ती गेल्यामुळे बापूरावांची लेखणी बंद पडली. पवळाने मारुती कवळेकर नावाच्या सावकाराच्या नादाने स्वतंत्र फड काढला आणि तो न चालल्याने ती परत पठ्ठे बापूरावांकडे आली. ‘कली युगाचा ऐका दाखला ! पठ्ठे बापूराव भुलला पवळीला ` असे ठामपणे सांगणारा हा शाहीर पुहा एकदा `शाहीर पठ्ठे बापूराव आणि नामचंद पवळाबाई यांचा ढोलकीतील तमाशा या नावाने नव्या जोमाने सुरु झाला. खर्‍या अर्थाने पवळा बापूरावांशी एकरुप झाली होती. ६ डिसेंबर १९३९ साली पवळा परिंचे येथे काळाच्या पडद्याआड गेली. तेथेच तिचे दफन केले गेले.
पवळा पठ्ठे बापूराव यांना कायमचे सोडून गेली. त्यामुळे ते खचून गेले. शेवटी शेवटी तर ते खूपच विपन्नावस्थेमध्ये होते. त्यांच्याच फडात काम करणाऱ्या ताई परिंचेकर यांनी त्यांना शेवटपर्यंत सांभाळले. या श्रेष्ठ कवीचे २२ डिसेंबर १९४५ रोजी निधन झाले. पवळावर पठ्ठे बापूराव यांचे अतोनात प्रेम होते. ते एकमेकांशी एकरुप झालेले होते. पवळाचेही बापुरावांवर जिवापाड प्रेम होते. त्यांचे लग्न झाल्याचेही सांगण्यात येते. त्यांना वेगळे करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. पण ते शक्य झाले नाही. बापुरावांच्या विरोधात पवळाचे कान भरण्यात आले. तिला बापुरावांपासून दूर करण्यात आले. बापुरावांना वेगळा तमाशाचा फड काढण्यासाठी बाध्य केले गेले. पवळा अत्यंत रुपवान स्री होती. अनेकांना ती हवी होती. तिच्या सौंदर्यावर कैक तालेवार भाळले होते. पठ्ठे बापूराव यांच्या जीवनावर आधारित ‘लावण्यवती’ या चित्रपटात बापुरावांपासून तोडण्यासाठी पवळाला पळवून नेल्याचे दाखविण्यात आले आहे. ब्राम्हण अंत्यजांमुळे झालेली धार्मिक बदनामी मोठ्या प्रमाणात बापुरावांच्या वाट्याला येत असलेली पाहून पवळाने आत्महत्या केली किंवा तिचा खून झाला असावा असा अंदाज आहे. पवळाच्या शेवटच्या दिवसांत ती तिच्याा माहेरी भावांाकडे राहिल्याचे समजते. ती अनेक व्याधींनी आजारग्रस्त होती. त्यातच तिचा अंत झाला. दोघांच्याजीवनात पैसा, प्रसिद्धी आणि मौलिक प्रतिष्ठा लाभली असली तरी पवळामुळे श्रेष्ठवर्ण ब्राह्मण असूनही सोवळे घडी घालून ठेवणाऱ्या आणि तमाशाची मशाल हाती धरुन लाज देशोधडी लावणाऱ्या पठ्ठे बापूरावांत झालेले मूल्यांतर फार महत्त्वाचे आहे. यापुढे पवळाच्या पठ्ठे बापूरावांना जातीअंताच्या लढाईचा एक महान शिलेदार म्हणून गणावे लागेल.

– गंगाधर ढवळे, नांदेड.
मो. ९८९०२४७९५३.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *