आपल्या सर्वांच्या आयुष्यात आपल्या गुरूंचे, शिक्षकांचे महत्त्वाचे स्थान असते. आपल्या बालवयातील संस्कारक्षम मनाला पुढे जाऊन योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात आणि यातूनच आपली जडणघडण होत असते.
माझ्या आयुष्यात ही, मला खूप चांगल्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्यापैकी खास करून लक्षात राहिलेले शिक्षक म्हणजे, आमचे गणिताचे सर, ‘ श्री चव्हाण सर’.
साधारण सरांचे वय तेव्हा 35 ते 40 या दरम्यान असावे. ते कायमच साधी राहणी उच्च विचारसरणी यावर विश्वास ठेवत. मध्यम बांधा, गव्हाळ वर्ण, हसतमुख चेहरा आणि सतत ते उत्साही असत.
नाते जरी गुरू-शिष्याचे असले तरी त्यांचे आम्हा विद्यार्थ्यांसोबत चे संबंध मैत्रीपूर्ण होते. त्यांच्या हसत-खेळत शिक्षण पद्धतीमुळे ते आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होते. त्यांचा प्रत्येक तास म्हणजे आनंदाची पर्वणी ठरायची. गणितासारखा अवघड विषय सुलभ करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कसब त्यांच्याकडे होते. बीजगणिताच्या राशींचा ढीग कधी पार केला ते आम्हाला कळतही नव्हते. भूमितीची प्रमेय प्रेममय भासू लागली. हुशार मुलांना प्रोत्साहन तर सामान्य मुलांना उत्तेजन देत असत.
‘ गणिताची वही कशी असावी’ या उदाहरणादाखल माझी वही वर्गात वरचेवर दाखवायचे. मग काय, आमची कॉलर एकदमच टाईट. एखाद्या ऑफ तासाला आले की, नुसती धमालच असायची. कधी शब्दांच्या भेंड्या, तर कधी सामान्यज्ञानावर घेतलेली प्रश्नमंजुषा. मग तर आम्हा सर्वांना घंटा वाजू नये आणि हा तासच संपू नये असे वाटायचे.
त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे मुलेही त्यांच्यासोबत सगळ्या समस्यांवर बोलत. प्रसंगी मुलांना धीर देऊन योग्य ती मदत सुद्धा करायचे.
दोन वर्षापूर्वी ‘गेट-टुगेदर’ च्या निमित्ताने सरांची भेट झाली. वयपरत्वे थोडासा झालेला बदल सोडला तर आजही सर पूर्वीसारखेच आनंदी आणि उत्साही दिसले. आमच्यासोबत पहिल्या सारख्याच मनमोकळ्या गप्पा मारुन, जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना, घेतलेल्या ‘आठवणींच्या विद्यार्थ्यांमध्ये’ माझे नाव ऐकून मन गहिवरून आले.
सौ. सुप्रिया कांबळे
सांगोला
Leave a Reply