ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिक्षक राष्ट्र निर्माणाचा आधार स्तंभ

September 5, 202117:28 PM 59 0 1

शिक्षण हा लोकशाहीचा पाचवा आधार स्तंभ आहे.शैक्षणिक गुणवत्ता ही प्रत्येक देशाची ओळख असते. व्यक्ती, समाज, राष्ट्र निर्मितीचा मार्ग शिक्षणातून जात असल्यामुळे शिक्षणाला राष्ट्र निर्मितीत अनन्यसाधारण महत्व असते. शिक्षणाला योग्य दिशा देणारी यंत्रणा सक्षम असेल तर त्या देशाची प्रगती ही सुसाट वेगाने होते. या यंत्रणेला बळकट करणारा कणखर आधारस्तंभ म्हणजे ‘शिक्षक’ होय.

‘ शिक्षक’ या शब्दाचा अर्थ ‘शिक्षक’ या शब्दांतच दडलेला आहे .शि-शिलवान, क्ष- क्षमाशील, क- कर्तव्यनिष्ठ.जन्म देणारा केवळ आपल्याला जगात आणतो, परंतू जगात आल्यानंतर जगण्याचे खरे पैलू उलगडण्याचे व त्या जगण्याला आकार आणि दिशा देण्याचे कार्य शिक्षक करत असतात. शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता,आशावाद हे घटक मुलांना जगण्याचे नवे सामर्थ्य व प्रेरणा देण्याचे कार्य करतात. शिक्षकांची शाळेतील उपस्थिती म्हणजे देवघरातील नंदादीपचं होय.या नंदादिपामुळेचं विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान होण्यास मदत होते. शिक्षक ही समाजातील अंधकार दुर करणारी मशालच म्हणावी लागेल.शिक्षक ही केवळ एक व्यक्ती नसुन संस्काराचे एक विद्यापीठचं असते. विद्यार्थी घडवून एक संवेदनशील नागरिक घडविणे व अशा नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व मनुष्य निर्माणाचे कार्य निरंतर घडत असते. राष्ट्र निर्मितीचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जा वरच अवलंबून असतो.यावरून शिक्षकांचे समाजातील महत्त्व लक्षात येते. एका जपानी सुभाषितकाराने म्हणूनच म्हटले आहे की, “हजार दिवस कसुन अभ्यास करण्यापेक्षा एका आदर्श शिक्षकांसोबत एक दिवस घालवणे अधिक श्रेयस्कर आहे.”


अंधारभरल्या चिमुकल्या गोळ्यातून सुर्याचे तेज किरण बाहेर काढणारा एक शिक्षकच असतो. समाजामध्ये क्रांतीकारक विचारांची पेरणी एक शिक्षकच असतो. त्यातून समाज परिवर्तन करण्याचे कार्य होते.पण वास्तविकतेचा विचार केला तर काळ बदलत गेला,तसा शिक्षकी पेशात ही बदल झाला आहे.शिक्षक हा शैक्षणिक कामांव्यतिरिक्त अन्य कामांत ही गुंतू लागला.त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला.शिक्षकांचे प्रत्यक्ष शैक्षणिक कामातील योगदान कमी होत गेले आणि शालेय शिकवणी मध्ये कमतरता निर्माण झाली.अशैक्षणिक कामाचा बोजा वाढत तर गेलाच शिवाय त्या कामामध्ये कसर निर्माण झाल्यास कार्यवाही होऊ लागली.पर्यायाने शिक्षकांची शिक्षकी पेशावरची निष्ठा निश्चितच कमी झाली व त्यांचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर झाल्याचे दिसुन आले.सद्य परिस्थितीचा विचार केला तर आकाशाला गवसणी घालणारी टक्केवारी आणि ढासळत जाणारी गुणवत्ता” हा प्रश्न केवळ बोर्डाच्या परिक्षेपुरता मर्यादित नाही तर त्याने ‘के. जी ते पी.जी’ पर्यंतचे विश्व व्यापून टाकले. आहे.पहिली ते आठवी पर्यंतच्या शिक्षणातील गुणवत्तेचे लक्तरे तर प्रतिवर्षी आपल्या समोर येत आहे. परिणामी शिक्षणाचे बाजारीकरण झाले. या बाजारीकरणात शैक्षणिक संस्था या रिकामी पिढी निर्माण करणाऱ्या कारखाना ठरल्या तर देशांचा आधारस्तंभ मानला जाणारा शिक्षक शिक्षणांच्या या बाजारीकरणात देशाचा दुकानदार असल्याचे दिसून येत आहे.यामुळे शैक्षणिक क्षेत्रात अनेक नकारात्मक गोष्टींचा शिरकाव झाला. परिणामी शिक्षकी पेशाला ग्रहण लागले ते इथेच.वर्तमानातील शिक्षणात पालकांच्या व संस्थाचालकांच्या भरमसाठ टक्केवारीच्या दिवाळीच्या अपेक्षेने शिक्षकांचे कधी दिवाळे निघाले हे समजलेच नाही. ही सत्यता असुन या चक्रव्युहात पालक, विद्यार्थी, समाज आणि राष्ट्र यांचा अभिमन्यू झाला आहे. ही सत्यता आहे. या चक्रव्यव्हात राष्ट्र निर्माणाचा आधार स्तंभ असलेला शिक्षक दिवसेंदिवस गुरफटला जात आहे. हे स्पष्ट दिसुन येत आहे. हे वास्तविकतेचे विचित्र चित्र पाहिल्या नंतर असं सांगावस वाटत कि,

‘आदर्श शिक्षक आता, मुठभर राहिले
शिक्षणाचे आता मी, व्यापार पाहिले
काय घडेल तो विद्यार्थी नागरिक सच्चा
डिग्रीस ज्याने धन असे अपार वाहिले’

भारतीय शिक्षण व्यवस्थेत बदलत्या काळानुसार बदल घडवायचे असतील तर खुप बारकाईने अभ्यास करुन त्यात परिवर्तन व शैक्षणिक क्रांती घडवून आणने महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी परिवर्तनाचे व संक्रमणाचे मार्ग तंत्राधिष्ठित करणे गरजेचे आहे. तसेच शिक्षकांनी आपल्या शाळांमधून परिक्षार्थी तयार करण्यापेक्षा ज्ञानांकांशी, विवेकनिष्ठ, प्रयोगवीर तयार करावेत. तसेच शाळा या निकामी शैक्षणिक कारखाने बनविण्यापेक्षा त्या विद्यार्थीचे जीवन घडविणाऱ्या प्रयोग शाळाचं झाल्या पाहिजेत. तसेच शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य अत्यंत कुशलतेने व आनंदीवृत्तीने करायला पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने बुध्दीवादी शक्ती या भूमिकेतून नवनवीन तंत्राचा अध्यापन पध्दतीचा वापर करावा.
देशातील सर्व नागरिक आदर्श व सुसंस्कारीत निर्माण होण्यासाठी तसेच शिक्षकांना आत्मबळ मिळण्यासाठी शासकीय पातळीवर ही काही बदल होणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता शिक्षकांच्या डोक्याला भुंगे लावणाऱ्या तापदायक अतिरिक्त कामांच्या चक्रव्यूव्हात शिक्षकांचा अभिमन्यू झालेला असताना सरकारचे मात्र त्यावर मौन असते.शैक्षणिक धोरणांच्या मसुद्यात नमूद केलेल्या आकडेवारी नुसार आजमितीस बरीच शिक्षकांची पदे रिक्त राहतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास वेशीला टांगला जात असून कला आणि क्रीडा यांना कमी महत्त्व दिले जात आहे. एका भाषा विषयात पदवी संपादन केलेल्या शिक्षकांस इतर विषय ही शिकवने बंधनकारक आहे. या पध्दतीत बदल होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी भरमसाठ विद्यार्थी संख्या एकाच वर्गात भरल्याने शाळा ही शाळा नसून कोंडवाडा आहे कि काय? हा संभ्रम निर्माण होतो.त्याच बरोबर शिक्षणाच्या बाजारीकरणात गुणवत्तेवर आधारीत शिक्षक भरतीची केवळ घोषणाबाजी नाही,तर कठोर अंमलबजावणी ही झालीच पाहिजे. तसेच शाळा वाटपाचे निकष फिक्स असावेत.जेणे करुण फिक्सींगला आळा बसेल. तसेच मुल्यामापन पद्धतीत सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून योग्य ते बदल करावेत. शिक्षण म्हणजे केवळ पुढे ढकलणे ही शिक्षणाची व्याख्या बदलून शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकासातून जीवनाला योग्य आकार देणारी व्यवस्था असावी.तसेच गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या विळख्याने शैक्षणिक गुणवत्तेची जी हानी झालेली आहे.ती कधीही न भरून निघणारी हानी आहे.मुलांच्या शिक्षण या विषयाकडे पालक,शिक्षक,शासन,समाज व्यवस्थेने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे,तरचं उद्याचा घडणारा भारत हा डाॅ.ए.पी.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत असेल व यातच तुमचे,आमचे व देशाचे उज्वल भवितव्य असेल.

– कु. कल्पना कल्याण घुगे,जालना.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *