सातारा,(विदया सुरजकुमार निकाळजे) पळशी ता माण येथील हसतमुख व्यक्तिमत्त्व आणि आदर्श शिक्षक मयूर खाडे यांचे आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रावर दुःखाचे सावट पसरले होते. अंशदायी पेन्शन योजना म्हणजे डी सी पी एस या योजनेत असल्याने शासनाकडून त्यांच्या कुटूंबियांना आणि वारसांना कसलीही आर्थिक तरतूद करण्यात आली नव्हती त्यामुळे सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी सातारा जिल्हा प्राथमिक सहकारी बँकेने बँकेचे सभासद असलेल्या मयूर खाडे यांच्या वारसांना दहा लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते.बँकेचे चेअरमन श्री राजेंद्र घोरपडे,व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे आणि संपूर्ण संचालक मंडळ यांनी श्री मयूर खाडे यांच्या गावी पळशी ता माण येथे जाऊन सदर मदतीचा धनादेश मयूर खाडे यांच्या पत्नी,व आई वडील यांच्याकडे सुपूर्द केला.
सहकार क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत तथापि प्राथमिक शिक्षक बँक नेहमीच सभासदांचे हित जपण्यासाठी प्रयत्नशील असून सभासदांच्या हितासाठी सदैव तत्पर राहील असे आश्वासन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष श्री सिद्धेश्वर पुस्तके यांनी दिले. अंशदायी पेन्शन योजनेतील मृत सभासदांचे वीस लाखांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय बँकेने घेतला असून निष्कर्जी सभासदांच्या वारसांना तात्काळ दहा लाख रुपये मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही महाराष्ट्रातील पहिली बँक ठरली आहे असे बँकेचे व्हाईस चेअरमन श्री महेंद्र अवघडे यांनी सांगितले. यापूर्वीच शिक्षक बँकेने व्याज दर कमी करून सभासदांना दिलासा दिल्याचे बँकेचे चेअरमन श्री राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले. यावेळी फलटणचे गटशिक्षणाधिकारी श्री रमेश गंबरे,तसेच बँकेचे संचालक मंडळ, आणि शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. श्री राजाराम खाडे यांनी प्रास्ताविक केले श्री रामभाऊ खाडे यांनी सूत्रसंचालन केले आणि शशिकांत खाडे यांनी आभार मानले.
Leave a Reply