ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोनाग्रस्त शैक्षणिक वर्षांना जोडणारा सेतू : ब्रिज कोर्स

July 30, 202118:52 PM 113 0 0

सद्याच्या कोरोनाकाळाने शिक्षणक्षेत्र पूर्णतः काळवंडून गेले आहे. गतवर्षी मार्च महिन्यापासून संबंध वर्षभरात कोरोनाच्या भितीमुळे शाळा नियमितपणे सुरू झाल्या नाहीत. ही भिती पालकांत आणि शिक्षकांत तसेच प्रशासनातही रुजून राहिली होती. त्यापेक्षा राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात ही भिती‌ कमालीची वास करुन राहिली. त्यामुळे मुले शाळेविना कितीही कंटाळली असली तरी कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू होणे अवघडच होते. परंतु शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून या काळात शासनाने आॅनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याची भूमिका घेतली. यातूनच सर्वच स्तरांतील कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने ‘वर्क फ्राॅम होम’ ही संकल्पना पुढे आली. या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने शिकविण्याचा अपरिहार्य पर्याय स्विकारण्यात आला. ग्रामीण असो वा शहरी, ज्या पालकांना साध्या मोबाईलला रिचार्जही करणे जमत नाही अशा पालकांसाठी अँड्रॉइड मोबाईल म्हणजे दीवास्वप्नच ठरले! हा मोबाईल सहजासहजी उपलब्ध होत नसल्यामुळे आणि त्याबरोबरच इतर कारणांमुळे आॅनलाईन पद्धतीने शिक्षण म्हणावे तेवढ्या प्रमाणात यशस्वी झालेले नाही. यावरही पर्याय म्हणून प्राथमिक/ माध्यमिकच्या शिक्षकांना गृहभेटीद्वारे रोजचा अभ्यास व स्वाध्याय देऊन काही प्रमाणात मार्गदर्शन केले जावे यासाठी आदेश देण्यात आले. त्यानुसार शिक्षकांनी‌मेहनत घेतली. मात्र संबंध वर्ष वाया जाणार असल्याची भिती पालकांत जोर धरू लागली होती. पालक वारंवार ‘वेट अँड वाॅच’ चीच भूमिका घेत होते. मात्र २०२१ उजाडताच दुसऱ्या लाटेची घंटा वाजली. मार्च/ एप्रिल महिन्यात प्रचंड उलथापालथ झाली. देशभरात सव्वाचार लाख लोक मृत्यू पावले. त्यात शिक्षकांची संख्याही लक्षणीय होती. तरीसुद्धा शिक्षकांनी जोखीम पत्करून आॅफलाईन पद्धतीने ‘शाळा बंद ; शिक्षण चालू’ हा उपक्रम नियमित सुरू ठेवला.


चालू शैक्षणिक वर्षात शैक्षणिक वर्ष भितीमय वातावरणातच सुरू झाले. दरवर्षीप्रमाणे शालेय पाठ्यपुस्तके वगळता सर्व सोपस्कार पार पडले. मात्र शिक्षण विभागाने व्यपगत झालेल्या गतवर्षाला या शैक्षणिक वर्षाशी जोडण्यासाठी पंचेचाळीस दिवसांचा ब्रीज कोर्स आणला. या सेतू अभ्यासक्रमाने वर्षभरात बालकामगार म्हणून पुढे आलेल्या आणि बुद्धीला गंज चढू पाहत असलेल्या काळाची दीपकाजळी काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. दस्तुरखुद्द शिक्षणमंत्र्यांच्याच धारावी मतदारसंघात शिक्षणाची परवड होत असल्याचे दिसून येत आहे. तेथील पालकांच्या आर्थिक चाचणीमुळे तसेच इतर काही कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन शिक्षणाला खीळ बसली आहे. आशियातील सर्वात मोठ्या आणि राजधानी मुंबईत असलेल्या झोपडपट्टीत ही अवस्था आहे तर उर्वरित ग्रामीण भागातल्या गरीब महाराष्ट्रात काय आलबेल असेल याची चिंता न केलेली बरी. पालकांनी शिक्षकांच्या भेटी घेणे, शिक्षकांनी गृहभेटी घेणे, दिलेला व्यवसाय अभ्यास संचाद्वारे पूर्ण करणे याद्वारे मुलांचे शिक्षण होत आहे. या पद्धतीने शिक्षण यशस्वी झालेले दिसून येते. तेव्हा या सगळ्यात सेतू अभ्यासक्रम हा महत्वपूर्ण ठरला आहे. हा अभ्यासक्रम इयत्ता दुसरी ते दहावीसाठी केवळ पंचेचाळीस दिवसांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. वर्गनिहाय काठिण्यपातळीनुसार दररोजच्या अभ्यासाची रचना करण्यात आली आहे. मूळात हा अभ्यासक्रम मागील इयत्तेतील महत्वाच्या संकल्पनांवर आधारलेला आहे. यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या निकालानूसार अकरावीत गेलेल्यांनी दहावीचा, दहावीतल्यांनी नववीचा, नववीतल्यांनी आठवीचा असा अकरावी ते तिसरी पर्यंत हा अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे. खरे तर पंचेचाळीस दिवसांत वर्षभराचे शिकणे शिकून घ्यायचे आहे. क्षेत्र, उद्दिष्टे, अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती यावर संबंध अभ्यासक्रमाची उभारणी करण्यात आली आहे.
मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमांची पूर्वतयारी असा दुहेरी उद्देश यामागे असल्याचे दिसते. हा अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला आहे. तो मागील इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांतील घटकांशी संलग्न आहे. क्षेत्र, क्षमता, निष्पत्ती याबरोबरच कौशल्य आणि संकल्पनांचे विकसन तथा दृढीकरण होणार आहे. त्यामुळे शिक्षकांना किंवा पालकांना याद्वारे विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करावयाचे आहे ते नेमकेपणाने स्पष्ट होते. पूर्वज्ञान जाणून घेण्यासाठी ‘जाणून घेऊ या’, संकल्पनांच्या दृढीकरणासाठी ‘सक्षम बनू या’, अधिकाधिक आकलन व्हावे याकरिता ‘सराव करु या’, चिकित्सक/सर्जनशील वृत्ती वाढावी तथा उच्चतम बोधात्मक क्षमतांचा विकास व्हावा यासाठी ‘कल्पक होऊ या’ ही सदरे त्यात अंतर्भूत करण्यात आली आहेत. त्याबरोबरच सर्व कृतींमध्ये व्हिडिओ लिंक्स, दीक्षा अॅप, क्युआरकोड इत्यादींची मदत घेण्याचेही सुचविले आहे. गणित या विषयासाठी समजून घेऊ, सराव करु, सोडवून पाहू या अशा मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. विज्ञान विषयासाठी कृतिपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यात छोट्या कृती, प्रयोगांची मांडणी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी चित्रांचा समावेशही करण्यात आला आहे. इंग्रजीसाठी या संपूर्ण अभ्यासक्रमात शिक्षकांनी तसेच पालकांनी एका सुज्ञ सुविधादात्याची भूमिका निभवावयाची आहे. त्यात लर्निग अॅक्टिव्हिटी, डेमो, प्रॅक्टिस, विस्तारित कृती किंवा समांतर कृतींसाठी दिलेल्या सूचनांनुसार काम करावयाचे आहे. ह्याच धर्तीवर सर्व इयत्तांची विषयांच्या अनुषंगाने थोड्याफार फरकाने मांडणी करण्यात आली आहे.
सेतू अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत शिक्षकांच्या काही भूमिका महत्त्वाच्या आहेत. दिलेल्या दैनंदिन कृतिपत्रिका विद्यार्थी प्रामाणिकपणे व स्वप्रयत्नाने सोडवताहेत याकडे पहिल्यांदा लक्ष दिले पाहिजे. यामधून उद्भवणाऱ्या अडचणी आधी शिक्षकांनी समजून घेऊन विद्यार्थ्यांना आवश्यक त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने हा अभ्यासक्रम वैयक्तिकरित्या दरदिवसाप्रमाणे पूर्ण करायचा आहे. अभिव्यक्ती, कल्पनाशक्ती, निरीक्षण, गप्पा, चर्चा, अध्ययन कृतींच्या माध्यमातून शिक्षकांनीच पूर्ण करुन घ्यायचा आहे. शाळा बंद असल्याने शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी शालेय संबंध तसा कमीच येतो आहे. त्यामुळे त्यांच्यात नेहमीप्रमाणे होणारी आंतरक्रिया कुंठीत झाली आहे. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी गृहभेटी देतील तेव्हा ते एकप्रकारचे अध्यापनच करतील असे गृहीत धरता येणार नाही. त्यांनी फक्त मार्गदर्शन करायचे आहे आणि विद्यार्थ्यांनी शक्य असल्यास घरच्यांच्या मदतीने स्वयंअध्ययन. खरे तर स्वयंअध्ययनाची प्रक्रिया साधारणतः माध्यमिक ते पदव्युत्तर आणि मुक्त शिक्षणासाठी हळूवारपणे राबविली जाते. आता मात्र कोरोनाने सगळ्यांनाच ही अपरिहार्यता अगदी बहाल केली आहे. टिलीमिली (टी.व्ही.), आॅनलाईन (मोबाईल) यांच्या माध्यमातून शिकतांनाच स्वाध्याय, गृहपाठ, घरचा अभ्यास (स्वतंत्र), व्यवसायमाला यांची लिखित साधने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकप्रकृतीनुसार पोहचवण्यात आलीत. यातून स्वयंअध्ययनाने आणि बाह्यमदतीने आपल्या आकलनक्षमतेनुसार काही शिकावयाचे हे शाळा व घर पातळीवर निश्चित झाले. बदलत्या ऋतुमानाप्रमाणे काहींना काही वेगळे अनुभव आले असतील हे नाकारता येत नाही.
या अभ्यासक्रमाच्या वस्तूनिष्ठ अंमलबजावणीसाठी दैनंदिन पीडिएफ संबंधित सर्व शिक्षकांना लिंक द्वारे पुरविण्यात आल्या आहेत. त्यातून दररोज डाऊनलोड करुन घेऊन शिक्षकांनी तयार केलेल्या व्हाटसप समुहात पाठवावयाच्या आहेत. ते काम नेमाने चालूच आहे परंतु ज्या पद्धतीने आॅनलाईन शिक्षण अयशस्वी होत आहे, त्या धर्तीवर पीडिएफचे प्रिंट काढून आॅफलाईन पद्धतीने वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घेता येतं, ही कल्पना जोर धरू लागली. तसे लगोलग झेरॉक्स सेंटरवर शिक्षकांची मोठी गर्दी होऊ लागली. किती पैसे लागतील याचा विचार न करता पदरमोड करून अनेक शिक्षकांनी आपल्या विषयनिहाय किंवा पटनिहाय सर्व विषयांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम एकाचवेळी प्रिंट करून घेतला आणि घरोघरी वितरीत केला. एकाचे एक पाहून हा फंडा व्हायरल झाला आणि पुढे तो अवलंबिण्यात आला. हा खर्चही एकुणात काही हजारांच्या घरात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कसलाच तगादा नको असे समजून घेत अनेक शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर हे काम केलं. या पंचेचाळीस दिवसांचे टाचणही काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यात विषयनिहाय क्षेत्र, क्षमता, अध्ययन निष्पत्ती व क्रमांक यांच्याही नोंदी करावयाच्या असून त्यासमोर आधी वर्ग/विषय शिक्षकांने आणि मुख्याध्यापकाने स्वाक्षरी नोंदवायची आहे. पंचेचाळीस दिवसांनंतर विद्यार्थ्यांकडे अभ्यास केलेला काही दिसो अथवा ना दिसो ; ही नोंद म्हणजे शिक्षकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करुन घेतल्याचा एक पुरावाच आहे. एवढेच नव्हे तर निश्चित केलेल्या कालावधीनंतर घ्यावयाच्या चाचण्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्यानंतर त्या तपासून विद्यार्थीनिहाय गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवायची आहे. तसेच चाचणी तपासताना विद्यार्थीनिहाय विश्लेषण करून मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन/ मदत करण्याबाबतही निर्देश दिले आहेत.
हा लेख लिहून प्रकाशित होईपर्यंत सेतुचा दुसरा टप्पा ओलांडला असेल. परंतु या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वत्र ज्ञानरचनावादाचा पुरस्कार आणि कार्यान्वयन होत असतांना हा क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम का तयार करण्यात आला? कोरोनापूर्व काळात डिजिटल शाळांची संकल्पना जोर धरत होती. कोरोनामुळे ती मोडीत निघाली असे म्हणायचे काय? एकवेळ आॅनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे हे मान्यच केले तर सेतू अभ्यासक्रमाच्या पूर्ततेसाठी आॅफलाईन पद्धतच योग्य आहे हे सरकारच्या ध्यानात आले आहे काय? हे जर ध्यानात घेतले गेले तर एखादवेळी शिक्षकांच्या कोव्हिड चाचण्या करुन त्याच प्रमाण मानून किंवा लसीकरणाची सक्ती करुन त्यांना घरोघर घराची दारे तुडविण्याकरिता कटिबद्ध का केले जात आहे? शाळा भरविण्याचा घेतलेला निर्णय सांप्रत अनेक अटी शर्तींच्या अधीन असला तरी तो कसा विस्तारित करता येईल याचा विचार शासनाने का करु नये? सेतूद्वारे आता मागील वर्षीच्या अध्ययनाची उजळणीच करायची असेल तर मग गतवर्षी असे त्या त्या इयत्तांचे सांख्यिकी मूल्यमापन झाले नसले तरी अध्ययन झाले हे मान्य करता यावयाचे नाही का? सर्वच इयतांसाठी लवचिकतेचा पर्याय ठेवून तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या संपादक मंडळाचे किमान एकाच इयत्तेच्या अभ्यासक्रमासाठी काही ठिकाणी मतैक्य झाले नसल्याचे दिसून येत असले तरी या अभ्यासक्रमाच्या अखत्यारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वच शिक्षक निमूटपणे कामाला लागले आहेत. या सर्व खटाटोपाच्या चळवळीऐवजी तिसऱ्या लाटेचे पडघम वाजण्याच्या आधीच सर्व विद्यार्थ्यांचे सुरळीत व सुरक्षितपणे लसीकरण व्हावे आणि विनाविघ्न शाळा प्रत्यक्षात सुरू व्हाव्यात तसेच या निमित्ताने उपस्थित झालेले प्रश्न रद्द व्हावेत, हीच एक अपेक्षा.
– गंगाधर ढवळे, नांदेड
मो. ९८९०२४७९५३.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *