मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून एक अनोखी घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या मृत्यूपत्रात निम्मी संपत्ती त्याचा पाळीव कुत्रा जॅकी आणि निम्मी संपत्ती पत्नी चंपा बाईच्या नावावर केली आहे. शेतकऱ्याच्या या निर्णयामुळे सर्वच हैराण झालेत.
कौटुंबिक वादातून शेतकऱ्याने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. बाडीबाडा गावातील शेतकरी ओम नारायण वर्मा यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला इमानदारीचं बक्षीस दिलं असून संपत्तीमधील ५० टक्के वाटा त्याच्या नावावर केला. शेतकऱ्याने त्याच्या मृत्यूपत्रात संपत्तीतील अर्धा वाटा कुत्र्याच्या नावावर केलाय, तर अर्धी संपत्ती पत्नीच्या नावावर केली. मुलांसोबत सतत वाद होत असल्याने ओम नारायण वर्मा यांनी मुलांऐवजी पाळीव कुत्र्याला आपल्या संपत्तीचा वाटा दिला असं सांगितलं जात आहे. “माझी पत्नी आणि माझा पाळीव कुत्रा माझी सेवा करतात आणि काळजी घेतात. त्यामुळे माझ्यासाठी हे दोघंही सर्वाधिक प्रिय आहेत. माझ्या मृत्यूनंतर सर्व संपत्तीवर पत्नी चंपा वर्मा आणि पाळीव कुत्रा जॅकी यांचा अधिकार असेल. तसेच, कुटुंबातील जो कोणी कुत्र्याची काळजी घेईल त्याला त्या संपत्तीचा पुढील वारीस मानलं जाईल”, असं 50 वर्षांच्या ओम नारायण वर्मा यांनी मृत्यूपत्रात नमूद केलं आहे.
ओम नारायण वर्मा यांनी कौटुंबिक वादातून 2 एकर जमीन आपल्या कुत्र्याच्या नावावर केली आहे. कुटुंबातील जो कोणी कुत्र्याची काळजी घेईल त्याला नंतर ती संपत्ती मिळेल.
Leave a Reply