जालना ( प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ या योजनांतील लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नसून सध्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट उफाळून येत असल्याने या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना थकीत मानधन तात्काळ देऊन प्रतिमहिना पाच हजार रुपये देण्यात यावे. अशी मागणी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मंगळवारी ( ता. २३) लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नायब तहसीलदार श्रीमती बनकर यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विविध मागण्यांबाबत पाठवलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे की, आटोक्यात आलेल्या कोवीड संसर्गाचा प्रादुर्भाव अचानक वाढू लागला असून पुन्हा लॉकडाऊन ची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे निराधार असलेल्या लाभार्थ्यांना आधीच तीन महिन्यांपासून मानधन नसल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत.
संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळत असलेल्या तुटपुंज्या मानधनात वाढ करून प्रती महिना पाच हजार रुपये मिळावे, कसत असलेले गायरान पट्टे विनाअट मातंग समाज बांधवांच्या नावे करण्यात यावे, लहुजी साळवे आयोगाची अंमलबजावणी केली जावी, आदिवासी, भिल्ल समाजबांधवांना आधारकार्ड, राशन व ग्रामपंचायत पुराव्यानुसार जात प्रमाण पञ दिले जावे, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, आण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या जयंती दिनी शासकीय सुट्टी जाहीर करून दारू ची दुकाने बंद ठेवावीत, मुंबई विद्यापीठास साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे नांव देण्यात यावे, मातंग समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण देऊन बार्टी च्या धर्तीवर प्रशिक्षण देणारी आर्टी संस्था स्थापन करावी, विधान भवन व संसदेच्या परिसरात दोन्ही महापुरुषांचे पुतळे उभारण्यात यावे, या मागण्यांचा समावेश असून शासन स्तरावरून मागण्या मान्य न झाल्यास संचारबंदी झुगारून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लेखी देण्यात आला. निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे, सौ.चंद्रकलाबाई गवळी ,बाबासाहेब पाटोळे, सर्जेराव पाटोळे ,श्रीमती कासाबाई शिरगुळे, कमलाबाई भारसाकळे, रमेश पाटोळे ,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Leave a Reply