शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक समजला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार भारतातील महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एका प्राथमिक शिक्षकास जाहिर झाल्याचे नुकतेच समजले आणि आमची छाती अभिमानाने भरून आली.सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परितेवाडी येथील तंत्र स्नेही शिक्षक श्री रणजितसिंह डिसले हे त्या ग्लोबल गुरुजींचे नाव.
युनेस्को व लंडन येथील वार्की यांच्या संयुक्त विद्यमाने हा सुमारे ७ कोटी रुपयांचा पुरस्कार लंडन येथील सुप्रसिद्ध नॅचरल हिस्ट्री म्युझीअम येथे सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी एका समारंभात श्री रणजितसिह डिसले यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक आहेत.भारतीय ज्ञान आणि तंत्रज्ञान जगात श्रेष्ठच आहे यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे.
जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्ञानदान करणारे शिक्षक अतिशय प्रामाणिक पणे काम करतात हेही याद्वारे सिद्ध झाले आहे.एरवी गुरुजीविषयी आपल्या अज्ञानाच्या जोरावर टीका करणाऱ्या तथाकथित ज्ञानी व्यक्तींना ही एक चपराक आहे.
क़्यु आर कोड द्वारे शिक्षणाचा मार्ग अतिशय सुकर ,आनंददायी आणि मनोरंजकपणे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम श्री रणजितसिंह डिसले गुरुजींनी केले आहे.
सध्या कोणत्याही इयत्तेचे पुस्तक उघडले कि त्यावर क़्यु आर कोड छापलेले आपणास दिसून येतात. हा कोड स्कॅन केल्यास त्या कोड द्वारे अतिशय प्रभावीपणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया पार पडते.कथा ,कविता ,पाठातील घटक यावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना सहज विनामुल्य उपलब्ध होता आहे .त्यामुळे शिक्षणाला वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ज्ञानाची प्रक्रिया अधिक प्रभावी होत असल्याचे दिसून येते.
सुमारे १४० देशातील १२ हजारांहून शिक्षकांनी या पुरस्कारासाठी नामांकन केले होते.विविध निकषांवर आधारित नामांकनातून श्री डिसले गुरुजींची विजेता म्हणून घोषणा करण्यात आली.त्यांनी केलेल्या कामाची ही एक पावतीच आहे.मिळालेल्या ७ कोटी पैकी निम्मी रक्कम स्पर्धेतील उर्वरित ९ गुरुजींना देण्याचे श्री डिसले गुरुजींनी जाहिर केले असून त्यामुळे ९ देशातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल तसेच डिसले गुरुजींना मिळालेला रक्कम टिचर इनोव्हेशन फंडकरिता वापरणार असल्याबाबत सांगितले आहे.
लेखक
सौ विद्या सुरजकुमार निकाळजे सातारा
८६०००८००६४
Leave a Reply