ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्वर्गीय स्वर हरपला

February 6, 202216:57 PM 51 0 0

गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या ३० दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. शनिवारी लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली. कोरोनाची लागण झाल्यापासून २८ दिवसांहून अधिक कालावधीनंतर अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. फक्त देशच नाही, तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे. लतादीदींच्या निधनाने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूरला झाला. मंगेशकर कुटुंबाचा पूर्वीपासूनच संगीताशी संबंध राहिला आहे. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर स्वतः गाणं गात आणि ते एक नाट्यकंपनी चालवायचे, तसंच अनेक विद्यार्थ्यांना ते संगीत शिकवत असत. परंतु, आपल्याच घरात इतकी सांगितिक प्रतिभा आहे, याची कल्पना त्यांना आली नव्हती. लता मंगेशकर नऊ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत मंचावरून गाणं म्हटलं होतं. त्या वेळी त्यांनी राग खंबामती गायला होता. आपल्या मुलीने चित्रपटांमध्ये वगैरे गाणं म्हणावं, अशी दीनानाथांची इच्छा नव्हती. परंतु, १९४२ मध्ये एका मित्राच्या विनंतीवरून पंडीत दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांना यासाठी परवानगी दिली आणि लता यांनी एका मराठी चित्रपटासाठी गाणं म्हटलं. या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं, पण चित्रपट पूर्ण झाला नाही, आणि महिन्याभराने दीनानाथांचा मृत्यू झाला. लहानपणीच वडिलांचं निधन झाल्यामुळे लता मंगेशकर यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरता लहान-मोठ्या भूमिका कराव्या लागत होत्या. परंतु त्यांना मेक-अप, अभिनय यातलं काहीच अजिबात आवडत नव्हतं. त्यांना केवळ गायिका व्हायचं होतं.या दरम्यान, संगीत दिग्दर्शक उस्ताद गुलाम हैदर त्यांच्या आयुष्यात आले. त्यांनी लता यांचा आवाज ऐकला आणि त्यांना घेऊन ते इतर संगीतकारांकडे गेले. लता जेमतेम १९ वर्षांच्या असताना त्यांचा आवाज पातळ असल्याचं सांगून त्यांना नकार देण्यात आला. परंतु ग़ुलाम हैदर स्वतःच्या मतावर ठाम होते. त्यांनी 'मजबूर' या चित्रपटामध्ये मुनव्वर सुलताना यांच्याकरता पार्श्वगायिका म्हणून लता यांना संधी दिली. 'तू एके दिवशी खूप मोठी कलावंत होशील आणि आता तुला नाकारणारे लोक त्या वेळी तुझ्या मागे लागतील', असं गुलाम हैदर यांनी म्हटलं होतं. नूरजहाँ आणि गुलाम हैदर दोघेही फाळणीनंतर पाकिस्तानात निघून गेले, परंतु त्यांनी लता यांच्याबद्दल केलेली भाकितं खरी ठरली. मजबूर' या चित्रपटातील लता मंगेशकरांचं गाणं ऐकून लता यांना कमाल अमरोही यांच्या 'महल' चित्रपटासाठी पार्श्वगायिका म्हणून काम मिळालं. त्यात त्यांनी 'आएगा आने वाला' हे गाणं म्हटलं. त्यानंतर लता यांच्याकडे चित्रपटांची रीघ लागली. त्यानंतरच्या काळात लता मंगेशकरांनी अनेक मोठमोठ्या संगीतकारांसोबत आणि किशोर, रफी, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांसोबत गाणी म्हटली. अगदी लहान वयात त्यांनी स्वतःच्या बळावर चित्रपट उद्योगात स्वतःचं स्थान निर्माण केलं.
त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठामपणे भूमिकाही घेतल्या. त्यासाठी दिग्गजांचा विरोध पत्करायचीही त्यांची तयारी होती. लता मंगेशकर यांनी साठच्या दशकातच चित्रपटांमधील त्यांच्या गाण्यांसाठी रॉयल्टी घ्यायला सुरुवात केली होती. परंतु, सर्व गायकांना रॉयल्टी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी मुकेश व तलत महमूद यांच्या सोबत एक संघटना स्थापन केली. गायकांना गाण्यांची रॉयल्टी मिळावी, अशी मागणी त्यांनी एचएमव्ही या रेकॉर्डिंग कंपनीकडे आणि निर्मात्यांकडे केली. परंतु त्यांच्या मागणीचा अव्हेर झाला. तेव्हा त्यांनी एचएमव्ही या कंपनीसाठी गाणी गाणं बंद केलं. मोहम्मद रफी रॉयल्टीच्या विरोधात होते. या संदर्भात चर्चेसाठी सर्व जण भेटले तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली. मोहम्मद रफी व लता यांच्यातील हा वाद ३ वर्षे धुमसत होता. याच मुद्द्यावरून लता मंगेशकर यांनी राज कपूर यांच्यासोबत काम करण्यालाही नकार दिला. सत्तरच्या दशकात राज कपूर पुन्हा त्यांच्या या आवडत्या गायिकेकडे परत गेले आणि 'बॉबी'साठी लता यांनी गाणी म्हटली. कोणत्या प्रकारची गाणी आपल्याला गायची आहेत, याबाबतही लता मंगेशकर यांनी स्वतःच्या इच्छेनुसार निवड केली. त्या काळी एखाद्या गायिकेला अशी निवडीची संधी मिळणं ही खूपच मोठी गोष्ट होती. लता मंगेशकर यांना त्यांच्या गायनाच्या कारकीर्दीमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. परंतु, १९५८ सालापर्यंत त्यांना सर्वोत्तम गायनासाठी एकही पुरस्कार मिळाला नव्हता, ही एक रोचक बाब आहे. त्यानंतर, १९५९ मध्ये पहिल्यांदा सर्वोत्तम गायनासाठीचा पुरस्कार देण्यात आला. १९६७ सालापर्यंत गायक व गायिका यांच्यासाठी एकाच पुरस्काराची तरतूद होती. लता मंगेशकर यांच्या गाण्यातील वैशिष्ट्यांबद्दल बोलणं अवघड आहे. गाण्यातील भावना व नजाकत आवाजातून समोर आणण्यात त्यांचा हातखंडा होता. साठ व सत्तर वर्षांच्या असतानाही लता मंगेशकर यांनी माधुरी दीक्षित, काजोल, जुही चावला, प्रिती झिंटा यांच्यासारख्या अभिनेत्रींसाठी गाणी म्हटली. लता मंगेशकरांच्या आवाजात 'ऐ मेरे वतन के लोगों' हे गाणं ऐकल्यावर जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले होते, हा किस्सा प्रसिद्ध आहे. गाणं झाल्यावर दिग्दर्शक महबूब खान लता यांना नेहरूंकडे घेऊन गेले. 'तू तर मला रडवलंसच' असं नेहरू त्या वेळी म्हणाले होते. १९७२,१९७४ व १९९० ला चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार याशिवाय इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. तसेच पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण, भारतरत्न या पुरस्कारांनी त्यांनी सन्मानित करण्यात आले आहे. शतकानुशतके त्यांच्या गोड आवाजातील गाणी रसिकांच्या कायम स्मरणात राहतील अशी आहेत. लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये ५० हजारांहून जास्त गाणी रेकॉर्ड केली आहेत. १९७४ मध्ये सर्वाधिक गाणी गायल्यामुळे त्यांची गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली होती. प्रत्येक स्वर ऐकणा-या, गाणा-या,गुणगुणणा-यांनाच नव्हे तर अगदी आसमंतातील स्वरांच्या अणू-रेणूंना ही प्रभावित करणारा तो मंजुळ पवित्र आवाज,सोज्वळ भाव, जरीकाठी साड़ी,अंगभर पदर,लोभस हसरा चेहरा काळाआड गेला तरी नजरेआड जात नाही. ”आदरांजली” लतादीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील,मनात देखील!!
-सुरेश मंत्री, अंबाजोगाई
संपर्क – ९४०३६५०७२२

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *