ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

युवकांचे आदर्श कुक्कूटपालन

December 19, 202023:23 PM 151 0 0

गडचिरोली जिल्हयात शासन विविध योजना प्रभावीपणे राबवून जिल्हयाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणत आहे. जिल्हयातील काही युवक-युवती नक्षल चळवळीकडे भरकटले असतांना दुसरीकडे बेरोजगार आणि दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्या युवकांनी एकजुटीतून स्वावलंबनाचा मार्ग शोधत कुक्कुटपालनाच्या व्यवसायात जिल्हयातील युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

आरमोरी तालुक्यापासून 11 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले छोटस गांव डोंगरसावंगी. डोंगरसांवगीतील 12 बेरोजगार व मोलमजुरी करणाऱ्या युवकांनी मे 2007 मध्ये एकत्र येऊन सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत बचतगटाची स्थापना केली. महिन्याकाठी प्रत्येकी 100 रुपये बचत खात्यात बचत करण्याचा निर्णय घेतला. वैनगंगा स्वयंसहाय्यता बचतगट स्थापून त्यांनी बचतीला सुरुवात केली. बचतीचा पैसा त्यांच्याच अडीअडचणीच्या कामी येऊ लागला. आरमोरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बचतगटाने खाते उघडले. सतत 5 वर्षापर्यंत अंतर्गत देवाण-घेवाण व योग्यप्रकारे बचत केल्याने बँकेत बचतगटाने आपली वेगळी ओळख निर्माण केली. या 12 युवकांनी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि बँकेकडे व्यवसाय उभारण्यासाठी कर्जाची मागणी केली.

बचतगटाचे अध्यक्ष संजय गरमळे, उपाध्यक्ष प्रदीप नन्नावरे, सचिव दुर्गाजी मेश्राम, सदस्य धनपाल लिंगायत, सुरेश सरपाते, भास्कर गरमळे, जयराम दोडके, प्रेमदास गेडाम, मुरलीधर येवले, राजू येवले, नथ्थुजी घरत आणि सुरुश बेहरे यांनी वैनगंगा पोल्टीफार्मची स्थापना केली. गावातील रस्त्याशेजारची तानबाजी मेश्राम यांची जागा कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभारण्यासाठी 10 वर्षाकरीता 14 हजार रुपयात लिजवर घेतली.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने शेडबांधकामासाठी 1 लाख रुपये दिले. बँक ऑफ इंडियाने व्यवसाय उभारण्यासाठी 2 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज दिले. बचतगटाने ब्रॉयलर जातीच्या कोंबडयाचा व्यवसाय सुरु केला. मागील पहिल्या वर्षी प्रत्येकी 200 कोंबडयांच्या तीन बॅचेस काढल्या. नागपूर येथून ब्रॉयलर जातीची पिले व कुक्कटखाद्य खरेदी करण्यात येते. दीड महिन्यात ही पिल्ले 3 किलोची होतात.

जागेवरच कोंबडयाची मांसाहारासाठी चिल्लर विक्री 80 रुपये किलोप्रमाणे करण्यात येते. दररोज सरासरी 10 किलो कोंबडयाची विक्री होते. रविवार, बुधवार, शुक्रवारी तर 2 क्विंटलपर्यंत कोंबडयाची विक्री होते. गावाशेजारच्या 10 किलोमीटर परिसरातील लोक येथून चिल्लर विक्रीसाठी कोंबडया नेत असल्याचे अध्यक्ष संजय गरमळे यांनी सांगितले. मागील वर्षी 600 ची काढून आता 800 पिल्लांची बॅच सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत असल्याने हा व्यवसाय वाढविणार असल्याची माहिती गरमळे यांनी दिली.

महिन्याला बचतगटाचे 4500 रुपये बँकेत नियमित भरण्यात येते. आतापर्यंत 11 महिन्यात 44 हजार रुपयांचा भरणा बँकेत करण्यात आला. दीड-दोन महिन्यात बॅचमागे निव्वळ नफा 40 ते 50 हजार रुपये मिळाला. मिळणारा नफा बचतगट सदस्यात वाटप न करता आधी बँकेचे कर्ज फेडून व्यवसाय वाढविण्यासाठी आणखी कर्ज घेण्याचे सर्व सभासदांनी ठरविले आहे. सर्व सभासदांनी निर्णय घेऊन कुक्कुटपालनाच्या देखभालीसाठी 24 तास शेडवर अध्यक्ष संजय गरमाळे यांची निवड केली. त्यांना महिन्याकाठी 3 हजार रुपये बचतगटातून देण्यात येतात. मागील वर्षी सुरु केलेल्या कुक्कुटपालन व्यवसायात बचतगटाने चांगली यशस्वी भरारी घेतली आहे. आजच्या घडीला त्यांच्या बचतगटाच्या खात्यात सव्वा लाख रुपये शिल्लक आहे. भविष्यात हा व्यवसाय व्यापक प्रमाणात सुरु करणार असल्याचे सचिव दुर्गाजी मेश्राम यांनी सांगितले. अडिच लाख रुपये कुक्कुटपालन व्यवसायासाठी घेतल्यामुळे त्यावर सव्वा लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

पूर्वी मोलमजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या बचतगटातील सदस्यांची कुक्कुटपालन व्यवसायामुळे आर्थिक स्थिती सुधारली आहे. मोलमजुरी करुन कष्टाच्या कमाईतून बचत करुन या युवकांनी कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करुन जिल्हयातील बेरोजगार युवकांना नवी दिशा दिली आहे.

Categories: यशोगाथा
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *