ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

हजारो अनाथ लेकरांची आई हरपली

January 6, 202212:36 PM 56 0 0

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणा-या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच मंगळवारी निधन झालं. सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा…पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे. सिंधुताईंची कथा सुरुवातीला याहून वेगळी नाही. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जेमतेम १५ महिन्यांचा कालावधी लोटला असेल, १४ नोव्हेंबर १९४८ ला आपला देश पंडित नेहरूंचा जन्मदिन “बालदिन” म्हणून साजरा करत होता आणि त्याच सुमारास वर्धा जिल्ह्यातील नवरगावी गुरे चारणाऱ्या अभिराम साठेंच्या घरात कन्या जन्माला आली.

आयुष्य सुरु झालं खरं पण लाडकी लेक म्हणून नव्हे तर ‘नकोशी’ म्हणून. नाव ठेवलं गेलं ‘चिंधी’. हे बाळ घरात कधी कौतुकाचा विषय ठरलं नाही. मुलगी म्हणून कायम हेळसांड आणि दुर्लक्ष तिच्या वाट्याला आलं. ती त्यातही समाधानी होती, काही तक्रार म्हणून नव्हती आणि असती तरी कुणाकडे केली असती. चाणाक्ष आणि तल्लख बुद्धीच्या चिंधीला शिक्षणाची भारी आवड! वडिलांच्या प्रेमामुळे जेमतेम ४ थी पर्यंत तिला शिक्षण घेता आलं. गुरे चरायला गेल्यावर लहानशी चिंधी संधी साधत शाळेत जाऊन बसे. तिच्या वडीलांना तिला शिकविण्याची इच्छा होती, परंतु आईचा दुसवास आणि अवहेलना झेलत लहानशी चिंधी कुठपर्यंत मजल मारणार? जेमतेम ११ वर्षांची असेल तेव्हा चक्क ३० वर्षाच्या श्रीहरी सपकाळ नावाच्या इसमाशी तिचा विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर काही दिवसातच एकभूत आधार असलेलं वडिलांचं छत्र देखील काळाने हिरावून घेतलं. लहानपणीच लग्न झाल्यावर खेळण्या बागडण्याच्या वयात ती कोवळी पोर तीन लेकरांची आई झाली होती. गावातील इतर स्त्रियांप्रमाणेच चिंधीचं जगणं देखील शोषण आणि अपमानाने भरलेलं होतं पण तिच्यात एक वेगळेपण होतं, ते म्हणजे तिच्यातील आत्मविश्वास आणि चार चौघात आपलं म्हणणं ठामपणे मांडण्याची निर्भीडता तिच्यात ठासून भरलेली होती. गावातील जनावरांचे शेण उचलण्याचा मोबदला मिळविण्याकरता ताईंनी पहिलं बंड पुकारलं. गावातल्या स्त्रियांना न्याय मिळवून दिला. ताईंचा विजय झाला पण गावातल्या जमीनदाराचा अहंकार दुखावला. झालेल्या अपमानाचा त्याला सूड घ्यायचा होता, त्यावेळी चिंधी नऊ महिन्यांची गर्भवती होती, जमीनदाराने तिच्या पोटातील मूल त्याचे असल्याचे सांगत तिच्या नवऱ्याचे कान भरले. नवऱ्याच्या मनात तिच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत तिला गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या तिने त्या मुलीला नदीच्या थंड पाण्याने स्वच्छ केलं आणि तिला घेऊन आपल्या विधवा आईचं घर गाठलं. समाजाच्या धाकाने आईने चिंधीला घरातून बाहेर काढलं. निराधार झालेली चिंधी दहा दिवसांच्या चिमुकलीला घेऊन जीव देण्यासाठी निघाली, वाटेत तिला पाण्याकरता तळमळत असलेला भिकारी दिसला. त्याला चिंधीने पाणी पाजलं जवळचा भाकर तुकडा दिला. त्या भिकाऱ्यालाथोडी तरतरी आली. या प्रसंगानं तीचं मन बदललं… हे दुसरं जीवन अनाथांना आश्रय देण्याकरता मिळालंय असं तिला वाटून गेलं. चिंधी करता हा पुनर्जन्म होता. तिच्याकरता आता चिंधीचे काही अस्तित्व उरले नव्हते. तीआता “सिंधू” झाली होती…अनाथांचे जीणे जगता-जगता सिंधुताई अनाथांची माय झाली, आपल्यासारख्या निराधार अनाथांना गोळा करत माईंनी भिक मागून त्यांची पोटं भरली. परभणी–नांदेड-मनमाड या रेल्वेस्थानकांवर माई दिवसभर भिक मागायच्या आणि रात्री झोपायला स्मशानात जायच्या. भीक मागताना त्या गायच्या,
ये ऊन किती कडक तापते
बाई अंगाची फुटते लाही
दोन दिसाचा शिळा तुकडा वाढा
चालेल आम्हा वाढा.
दार नका लावू
पुन्हा येणार नाही..
सिंधुताई सांगताना सांगतात कि ज्यावेळी त्यांना भिक मिळायची नाही त्यावेळी त्या स्मशानातील जळणाऱ्या चितेवर भाकरी भाजून खायच्या. अश्या प्रकारे स्मशानातील जळणाऱ्या चितेच्या उष्णतेत त्यांनी स्वतःच जीवन सावरलं. रात्री-अपरात्री देखील माई रेल्वे स्थानकांवर एकट्या जाऊन अनाथ मुलांना पदराखाली घेत मायेची सावली द्यायच्या. एक एक रस्त्यावरचं मुल ताई आपलसं करत गेल्या. हळूहळू लोक सिंधूताईंना “माई” म्हणून ओळखू लागले आणि स्वतःहून पुढे येऊन त्यांनी स्वीकारलेल्या अनाथ मुलांना दान देऊ लागले. त्यांनी अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. इतर मुलांची काळजी घेताना आपल्या मुलीमुळे दुजाभाव व्हायला नको म्हणून त्यांनी आपली मुलगी ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले.आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत. काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल द-यात वसतीगृह सुरु केले. आज ब-याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहेत. जवळ-जवळ २००० पेक्षा जास्त मुलांच्या सिंधुताई आई झाल्या. सिंधुताई देवाकडे मागणं मागतांना म्हणत :
“देवा आम्हाला हसायला शिकव
परंतु आम्ही कधी रडलो होतो.
याचा विसर पडू देऊ नकोस.”
सिंधुताईंसाठी समाजसेवा हा शब्द अपरिचित होता कारण त्या असे काही करत आहेत यावर त्यांचा विश्वास बसत नसे, समाजसेवा बोलून होत नाही असे त्यांचे मत होते. यासाठी काही विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही, तुम्ही नकळत केलेली सेवा म्हणजे समाजसेवा. हे करत असताना आपण समाजसेवा करत असल्याची भावना मनात येऊ नये. मनात राहून समाजसेवा होत नाही. दोन वर्षांपूर्वी त्या अंबाजोगाईला आल्या असताना त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मला मिळाली होती. बोलत असताना त्या एकामागून एक इतकी वाक्ये उच्चारतं की ही बाई खरोखरच अन्नपूर्णा आहे की सरस्वती आहे, असे वाटे. मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधुताई 'अनाथांच्या आई' होत्या. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हातकरीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभे केलेले काम प्रशंसनीय आणि वंदनीय आहे. त्यांची कहाणी महाराष्ट्राला काही नवीन नाही. खुद्द त्यांच्या भाषणांतून, त्यांच्यावरील लेखनांतून आणि चित्रपटातून ते सर्वांसमोर गेले आहे. गेल्यावर्षीच त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार स्वीकारताना '' माझी प्रेरणा, माझी भूक ही पोटाची, भाकरीची. मी भाकरीला धन्यवाद देते कारण भाकरीच मिळत नव्हती. माझ्या लेकरांना भाकरी मिळावी म्हणून रानोरान फिरले. लोकांनी मला सहकार्य केलं. त्यावेळी देणाऱ्यांचे, त्या काळात ज्यांनी माझी झोळी भरली त्यांचे आणि मला जगण्याचं बळ दिलं त्या माझ्या लेकरांचा या पुरस्कारावर अधिकार आहे, उरलासुरला माझा,” अशी भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली होती. सिंधुताईंना त्यांच्या कार्यासाठी आत्तापर्यंत ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, मूर्तीमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार, आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार, लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार हे त्यातले काही निवडक पुरस्कार आहेत. मला अनेक पुरस्कार मिळाले. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही’. म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरत. चारपैकी एकाच अनाथाश्रमाला सरकारी अनुदान मिळतं. सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होत असे. ‘गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही’, असं म्हणत, आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असत. माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली.पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. ‘निराश्रित’, ‘बेवारस’ असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, तेच इतरांनाही मिळावं, म्हणून त्यांची धडपड सुरू असे. ‘देवा, आम्हांला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस’, हे माईंनी त्यांना शिकवलं आहे. ज्यांच्या नशिबी फक्त अवहेलना आली, जन्म घेतल्यानंतर त्यांच्या चिंधी या नावापासूनच ती सुरू झाली होती त्या पुढे जगासाठी जागृतीची पणती झाल्या. अनाथांची माय झाल्या. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने आता कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
– सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *