बारामती : कोरोनाची लक्षणे आढळल्याने रुग्णाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ही घटना घडली. कोरोनाची लक्षणे आढळल्याने नैराश्यातून 65 वर्षीय नागरिकाने राहत्या घरात गळफास घेतला. गेल्या चार पाच दिवसांपासून अंगदुखी, घसादुखी आणि खोकल्याने त्रस्त असलेल्या या ज्येष्ठ नागरिकाला कोरोना तपासणी करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली.
प्रकाश विष्णूपंत भगत (वय 65) असं आत्महत्या केल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. त्यांना मागील चार-पाच दिवसांपासून घसादुखी, अंगदुखी, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळं स्थानिक रुग्णालयात त्यांना कोरोना तपासणी करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी काल भिगवण येथील त्यांच्या राहत्या घरातील स्वयंपाक खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.
याबाबत भिगवण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोनाबद्दल भीती मनात न ठेवता तातडीने तपासणी करून उपचार करावेत असं आवाहन भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केलं आहे.
अंबाजोगाईत एकाचवेळी 28 जणांवर अंत्यसंस्कार
बीडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका फटका बसत आहे. बीडच्या अंबाजोगाईत 30 जणांचा काल एका दिवसात मृत्यू झाला आहे. यातील 28 जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आली. त्यामुळे कोरोनाचे हे मृत्यूतांडव अनेकांना धडकी भरवत आहे.
Leave a Reply