गंगेचे महत्त्व – धार्मिकदृष्ट्या इतिहासाच्या उषःकालापासून कोटी कोटी हिंदू भाविकांना मोक्ष प्रदान करणारी गंगा, हे विश्वातील सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. आध्यात्मिक क्षेत्रात जे स्थान गीतेचे आहे, तेच स्थान धार्मिक क्षेत्रात गंगेचे आहे. प्रस्तुत लेखात ‘गंगे’विषयी धर्मग्रंथांनी तसेच ऋषीमुनी, साधू-संत यांनी केलेली स्तुती यांबरोबरच गंगोदकाचे हिंदूंच्या जीवनातील स्थान आणि गंगाजलाचे महत्त्व, प्रदूषण आणि उपाययोजना यांविषयी माहिती देण्यात आली आहे.
धर्मग्रंथांनी वर्णिलेली गंगेची महती अर्थात गंगेचे महत्व
1. ऋग्वेदामध्ये प्रसिद्ध नदीसूक्तात सर्वप्रथम गंगेचे आवाहन आणि स्तुती केली आहे.
2. पद्मपुराणमध्ये विष्णु सर्व देवांचे प्रतिनिधित्व करतो आणि गंगा विष्णूचे ! यामध्ये गंगेची महती वर्णितांना म्हटले आहे की, पिता, पती, मित्र आणि नातेवाईक हे व्यभिचारी, पतित, दुष्ट, चांडाळ आणि गुरुघाती झाले असल्यास अनुक्रमे पुत्र, पत्नी, मित्र आणि नातेवाईक त्यांचा त्याग करतात; पण गंगा त्यांना कधीही त्यागत नाही.
3. महाभारतात ‘देवतांना अमृत, तसे मनुष्यांसाठी गंगाजल (अमृत) आहे.’
4. श्रीमद्भगवद्गीते मध्ये याविषयी म्हटले आहे कि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला (अध्याय 10, श्लोक 31 मध्ये) विभूतीयोग सांगतांना ‘स्रोतसामस्मि जाह्नवी ।’, अर्थात् ‘सर्व प्रवाहांत मी गंगा आहे’, असे सांगितले.
सर्व संप्रदायांना वंद्य अशी गंगा – भारतात सकल संत, आचार्य आणि महापुरुष, तसेच सर्व संप्रदाय यांनी गंगाजलाचे पावित्र्य मान्य केले आहे. शंकराने गंगा मस्तकी धारण केल्यामुळे शैवांना आणि विष्णूच्या चरणकमलापासून गंगा उत्पन्न झाल्यामुळे वैष्णवांना ती परमपावन वाटते. शाक्तांनीही गंगेला आदिशक्तीचे एक रूप मानून तिची आराधना केलेली आहे.
https://indianfast.com/
महापुरुषांनी केलेली गंगास्तुती –
1. वाल्मीकिऋषिनी रचलेले ‘गंगाष्टक’ हे स्तोत्र प्रसिद्ध आहे. भाविक संस्कृतज्ञ लोक स्नानाच्या वेळी त्याचा पाठ करतात. त्या वेळी त्यांची ‘स्वतःला गंगास्नान घडले’, अशी श्रद्धा असते.
2. आद्यशंकराचार्य यांनी गंगास्तोत्र रचले. त्यात ते म्हणतात –
वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः
अथवा श्वपचो मलिनो दीनस्तव न हि दूरे नृपतिकुलीनः ।। (श्लोक 11)
अर्थ : हे गंगे, तुझ्यापासून दूर जाऊन कुलीन राजा बनण्यापेक्षा तुझ्या या पाण्यातील कासव अथवा मासा होणे किंवा तुझ्या तिरावर रहाणारा सरपटणारा क्षुद्र प्राणी अथवा दीन-दुबळा चांडाळ होणे, हे कधीही श्रेष्ठ आहे.
3. गोस्वामी तुलसीदास यांनी त्यांच्या ‘कवितावली’च्या उत्तरकाण्डात तीन छंदांमध्ये ‘श्रीगंगामाहात्म्य’ वर्णिले आहे. त्यात प्रामुख्याने गंगादर्शन, गंगास्नान, गंगाजलसेवन इत्यादींचे महत्त्व सांगितले आहे.
4. पंडितराज जगन्नाथ (वर्ष 1590 ते 1665) यांनी ‘गंगालहरी’ (‘पीयूषलहरी’) हे 52 श्लोकांचे काव्य लिहिले. त्यात गंगेच्या लोकोत्तर अशा विविध गुणांचे वर्णन आणि स्वतःच्या उद्धाराविषयी कळकळीची प्रार्थना केली आहे.
हिंदु जीवनदर्शनातील गंगोदकाचे स्थान
दैनंदिन जीवनात नित्य स्नान करतांना गंगेसह पवित्र नद्यांचे स्मरण केले जाते. गंगोदकाने स्नान करणे बहुतेकांना अशक्य असल्याने महाराष्ट्रात पूर्वी तांब्यापासून किंवा पितळेपासून बनवलेल्या आणि पसरट तोंड असलेल्या ‘गंगाळ’ नावाच्या भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्याने स्नान करत.
धार्मिक जीवनातील महत्व –
1. जन्मात एकदा तरी गंगास्नान घडावे, अशी कोट्यवधी हिंदूंची इच्छा असते.
2. यात्रेकरू हरिद्वार, प्रयाग (अलाहाबाद) इत्यादी तीर्थांहून गंगाजल घरी आणून त्याची पूजा करतात. तसेच आप्तेष्टांना बोलावून त्यांना ते तीर्थ देतात.
धार्मिक चालीरितीनुसार महत्व –
1. स्थानशुद्धीसाठी गंगाजल वापरतात. जलशुद्धीसाठीही नवीन खोदलेल्या विहिरीत गंगाजल घालतात.
2. गंगाजल हातात घेऊन शपथ घेतात.
3. नवविवाहित जोडप्यावरही गंगाजलाचा अभिषेक करतात.
मृत्यूप्रसंगी आणि मृत्यूनंतर करावयाचे क्रियाकर्म आणि महत्व –
मृत्यूनंतर सद्गती मिळावी, यासाठी मृत्यूप्रसंगी व्यक्तीच्या मुखात गंगाजल घालतात आणि मृत्यूप्रसंगी तसे शक्य न झाल्यास मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजल घालतात; म्हणून घरोघरी गंगाजल ठेवलेले असते. (ते नसल्यास तुळस घातलेले पाणी वापरतात.)
मृतदेहावर अग्निसंस्कार करणे – ‘गंगातिरावर ज्या मृत व्यक्तींचे दहन होते, ते मृतात्मे स्वर्गाला जातात, असे म्हटले जाते; म्हणून पुष्कळ लांबून भाविक लोक अग्निदहनासाठी मृत व्यक्तींना येथे आणतात.
अस्थीविसर्जन आणि गंगेचे महत्व – गंगेत अस्थींचे विसर्जन करणे, हा एक महत्त्वाचा अंत्यविधी आहे. ‘गंगेत विसर्जित केलेल्या अस्थी जितकी वर्षे गंगेत रहातात, तितकी वर्षे त्या मृतात्म्याला स्वर्गात निवास करता येतो’, असे पद्मपुराण, नारदीय पुराण, स्कंदपुराण आणि अग्निपुराण, तसेच महाभारत यांमध्ये सांगितले आहे.
श्राद्ध कर्मातील गंगेचे महत्व – पितरांचा उद्धार होण्यासाठी त्यांचे गंगातिरावर श्राद्ध केले जाते.
देवनदी गंगेचे रक्षण करा !
भारतात ‘गंगा’ आणि ‘यमुना’ या सर्वांत महत्त्वाच्या नद्या आहेत. एका अहवालानुसार या सर्वांत दूषितही आहेत. गंगा नदी दूषित असण्यामागे औद्योगिक आस्थापना आणि उद्योगालये यांनी सोडलेले रसायनयुक्त सांडपाणी, इतर कचरा आणि धर्माच्या नावावर लोकांनी प्लास्टिकच्या पिशव्यातून फेकलेले पूजासाहित्य, ही दोन मोठी कारणे आहेत. वर्ष 1985 ते 2000 पर्यंत भारत शासनाने गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्याच्या कृतीयोजनेअंतर्गत 1 सहस्त्र कोटी रुपये व्यय केले. तरीही भारतातील सर्वात पवित्र गंगा नदी आजही दूषितच आहे. योजना आयोगाच्या अहवालाप्रमाणे गंगा नदीला केवळ प्रदूषणमुक्त करण्यासाठी 7 सहस्त्र कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
गंगेला स्वच्छ ठेवणे आणि तिचा प्रवाह अखंडित राहील, याचा आग्रह धरणे, हे आपले मानवीय, सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक कर्तव्य आहे. गंगा नदीचा आध्यात्मिक ठेवा जपण्यासाठी तिची निर्मळता, प्रवाहीपणा आणि पावित्र्य टिकवून ठेवणे अनिवार्य आहे. त्या दृष्टीने कित्येक आंदोलने उभी राहूनहीआजही यासाठी उदासीनताच दिसून येते.
विद्यमान निधर्मी लोकशाहीत गंगारक्षणास मर्यादा येत आहेत. खरेतर रामराज्यासारख्या आदर्श राष्ट्राची, म्हणजेच धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्रा’ची स्थापना करणे, हाच पवित्र गंगा नदीच्या रक्षणाचा खरा मार्ग आहे. गंगाभक्तांसह सर्व भारतियांनी गंगारक्षणासाठी ‘भगीरथ’ प्रयत्न करावेत आणि ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी कृतीशील योगदान द्यावे, ही श्री गंगादेवीच्या चरणी प्रार्थना !
संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था
संपर्क- 9284027180
Leave a Reply