ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सामाजिक एकतेच्या बळानेच क्रांतीचे चक्र फिरेल!- डॉ. प्रतिभा अहिरे

April 15, 202116:49 PM 96 0 0

नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केंद्रस्थानी ठेवून समाजकारण, राजकारणाच्या संदर्भाने गटातटात विखुरलेल्या विविध स्तरातील आंबेडकरी नेते, कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत आणि तमाम बुद्धीजीवी या सर्वांनीच एकतेची शक्ती निर्माण करायला हवी. आंबेडकरी विचार हा मूळातच क्रांतीचा आवाज आहे. क्रांतीला प्रतिक्रांतीचा धोका असला तरी सामाजिक समन्वय, प्रबोधन, सुसंवाद आणि एकतेच्या बळावरच क्रांतीचे चक्र पूर्णपणे फिरेल अशी मार्गदर्शक भूमिका आंबेडकरी विचारवंत लेखिका डॉ. प्रतिभा अहिरे यांनी मांडली. त्या आॅनलाईन व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी ‘क्रांतीचे चक्र पूर्ण कधी फिरेल?’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, अमृत बनसोड, अशोक खनाडे, संजय मोखडे, सुनंदा बोदिले, कार्यक्रमाचे संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर, भैय्यासाहेब गोडबोले, साऊल झोटे, सज्जन बरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने सात दिवसीय आॅनलाईन व्याख्यानमालेचे फेसबुकच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे. या मालेत पाचवे पुष्प औरंगाबाद येथून डॉ. प्रतिभा अहिरे यांनी गुंफले. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, इथल्या आंबेडकरी चळवळींना निष्प्रभ करण्याचे कारस्थानी काम सातत्याने सुरू आहे. चळवळीतील कार्यकर्ते, नेते आणि सर्वच बुद्धीजीवींची बुद्धीच भ्रमिष्ट करण्याचा आराखडा आखला गेला आहे. सामाजिक आणि मानसिक गुलामीतच संपूर्ण भारतीय समाज कसा राहील यासाठी दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतले आहेत. क्रांतीचा रथ जोमाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते स्वार्थांध झाले आहेत. अशा संविधाननिष्ठा जातीव्यवस्थेच्या बळी ठरल्या आहेत. बाबासाहेबांनी फिरवलेले क्रांतीचे चक्र उलट्या दिशेने फिरत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
आॅनलाईन व्याख्यानमाला सुरू असतांना अमित ठाकूर, संजय मोहाडे, संजय डोंगरे, शुभांगी जुमळे, शुभम ढोले, शिलवंत डोंगरे, अर्चना मेश्राम रामटेके, जलदा ढोके, अभय अवथरे, विजयेंद्र सुरवाडे, पंकज इंगळे, सरिता सातारडे यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. तसेच महामंडळाचे पदाधिकारी डॉ. सिमा मेश्राम, छाया खोब्रागडे, सुरेश खोब्रागडे, देवानंद सुटे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रशांत वंजारे यांनी संयोजक म्हणून तर गंगाधर ढवळे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले. आज १६ एप्रिल रोजी, सायं ७.०० वा. शुक्रवारी प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर हे व्याख्यानमालेचा समारोप करणार आहेत.

चळवळीत स्रियांचा सहभाग महत्त्वाचा
बाबासाहेबांच्या चळवळीत स्रिया अग्रभागी होत्या. समतेच्या आणि समानतेच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांना सर्वच बाबतीत बरोबरीने ठेवायला हवे होते. पण तसे झाले नाही. आंबेडकरी समाजातही आजच्या परिस्थितीत स्त्रियांना दुय्यम लेखण्याचे आणि तिच्यावर अधिक अन्याय करण्याचे प्रकार सुरू आहेत. ती उपभोग्य इंद्रियप्रबळ वस्तू आहे ही मानसिकता दूर व्हायला हवी. स्रियांचा युद्धक्षेत्र म्हणून वापर केला जातो. स्त्रियांना सतत मानसिक गुलामच बनवून ठेवलं जातं. अधीकाधिक बंधनं तिच्यावर लादली जातात. धम्मक्रांतीनंतरच्या इतक्या कालखंडानंतर आपण स्रिला समानतेची वागणूक देऊ शकलो नाही. तिच्याबाबातचा दृष्टिकोन बदलू शकलो नाही. स्रियांना माणूसपण बहाल केल्याशिवाय आणि स्रियांची सर्वांगीण प्रगती झाल्याशिवाय क्रांतीचे चक्र पूर्ण फिरेल आसे त्या शेवटी म्हणाल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *