मुंबई: संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. राजीनामा आला म्हणजे तो मंजूरच केला आहे. तो काय फ्रेम करून ठेवण्यासारखा नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी संजय राठोड प्रकरणावरून विरोधकांनी सुरू केलेल्या राजकारणावरही जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राठोड प्रकरणावर भाष्य केलं. संजय राठोड यांनी स्वत:हून माझ्याकडे राजीनामा दिला आहे. पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. तपास हा झाला पाहिजे. तो निष्पक्षपातीच असला पाहिजे. पण एखाद्याला लटकवायचं आणि आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तुम्ही म्हणाल तसा तपास होणार नाही. तुम्ही तपासाला दिशा देऊ शकत नाही आणि तपासही भरकटवू शकत नाही, असा हल्लाही त्यांनी विरोधकांवर चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचं सांगितलं. राजीनामा आल्यानंतर तो फ्रेम करून ठेवायचा नसतो. त्यामुळे तो स्वीकारण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
वन खातं माझ्याकडे
राठोड यांच्या खात्याचा भार कुणाकडे देण्यात आला? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर राठोड यांच्या खात्याचा पदभार माझ्याकडेच आहे. त्यांच्या खात्याचा कार्यभार सध्या मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहे. अधिवेशनात त्यांच्या खात्याशी संबंधित काही प्रश्न आल्यास मी त्याला उत्तर देईन किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री उत्तरं देतील, असंही त्यांनी सांगितलं.
मग आताच अविश्वास का?
राठोड प्रकरणाचा तपास नीट होऊ द्या. चौकशी होऊ द्या. केवळ आदळआपट करू नका. आज तुम्ही ज्या तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवत आहात तीच यंत्रणा आताही काम करत आहे, असं सांगतानाच तुमच्याही काळात चांदा ते बांदापर्यंत ज्या घटना घडल्या. मग आता अविश्वास कसा दाखवता? पोलीस हा सरकारचा कणा असतो, अशावेळी त्यांच्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.
कुणालाही पाठीशी घालणार नाही
सरकार चालवताना आमची जबाबदारी असते की न्यायाने वागणे. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. तुम्ही म्हणत असाल की इतके दिवस का लावले? गुन्हा दाखल करुन मोकळं होणं याला न्याय म्हणत नाहीत. ज्या वेळी घटना कळली. त्यावेळीच तपासाचा निर्णय झाला. पोलिसांना तसा आदेश दिला. तपासातून सत्य बाहेर येईल तेव्हा कुणालाही पाठीशी घालणार नाही. दोषीला कठोर शिक्षा देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.
अहवाल आल्यानंतरच निर्णय
विरोधी पक्षनेते हे पूर्वी मुख्यमंत्री होते. त्यामुळे गुन्हा कधी दाखल करतात हे त्यांनाही माहीत आहे. आधी तपासाचा प्राथमिक अहवाल येऊ द्या. अहवाल आल्यानंतर त्यात काही असेल तर त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
Leave a Reply