पुणे : सोसायटीच्या पार्किंगमधील कार चोरण्याचा प्रयत्न करणार्या चौघा चोरट्यांना कारचालकाने प्रतिकार केला, तेव्हा चौघांनी त्याला धारदार चाकूने भोसकलं. पुण्यातील नऱ्हेगाव भागात सोमवारी पहाटे घटना घडल्यानंतर कारचालक दोन तास रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. आपल्यावर चार चोरांनी हल्ला केल्याचं त्याने स्वतःच्या रक्तानेच जमिनीवर लिहून ठेवलं. साडेपाचच्या सुमारास सुरक्षारक्षक महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
प्रमोद किसन घारे असं 35 वर्षीय कारचालकाचं नाव आहे. ते नर्हेगाव परिसरातील भुमकर चौकात सिद्धी संकल्प सोसायटीत राहतात. ते शहरातील एका नामांकित कंपनीत अकाऊंट मॅनेजर म्हणून काम करतात. ही घटना सोमवारी (22 फेब्रुवारी) पहाटे पावणे चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी घारे यांच्या पत्नी कोमल घारे (वय 29) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नेमकं काय घडलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद घारे हे त्यांच्या कुटुंबियांसह नर्हेगाव येथील सिद्धी संकल्प सोसायटीत वास्तव्यास आहेत. रविवारी सुट्टी असल्याने ते त्यांच्या कुटुंबियांसह खडकवासला येथे फिरण्यासाठी गेले होते. पहाटे पावणेचारच्या सुमारास पार्किंगमध्ये कसला तरी आवाज सुरु असल्याने प्रमोद यांना जाग आली. त्यांनी गॅलरीतून पाहिले त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्या स्विफ्ट गाडीच्या दरवाजाशी झटापट करत असल्याचे दिसले.
चौघा चोरट्यांची मारहाण
प्रमोद यांनी खाली येऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्याने प्रमोद यांना मारहाण केली. त्यावेळी त्यांनी देखील चोरट्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. हा थरार सुरु असतानाच, चोरट्याच्या इतर तीन साथीदारांनी भिंतीवरुन सोसायटीत उडी घेतली. इतर तिघा चोरट्यांनी देखील प्रमोद यांना मारहाण करत निघून जाण्यास सांगितले. मात्र प्रमोद यांनी धाडसाने त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
कारचालकांवर चाकूहल्ला करुन चोरटे पसार
चोरट्यापैकी एकाने धारदार चाकूने प्रमोद यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पोटात दोन वेळा चाकू खुपसला. त्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने प्रमोद जागेवरच कोसळले. तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ ते रक्ताच्या थारोळ्यात पडून होते.
सुरक्षारक्षक महिलेमुळे प्रकार उघडकीस
सकाळी साडेपाचच्या सुमारास सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्या दमयंती ढकाल यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी प्रमोद यांच्या पत्नीला ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी खाली धाव घेऊन पाहिले असता, प्रमोद रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी पहाटे पावणे चारच्या सुमारास घडलेला थरार सांगितला. त्यानंतर सोसाटीतील नागरिक आणि प्रमोद यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
Leave a Reply