ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

असे झाले महामानवाचे महापरिनिर्वाण

December 19, 202017:16 PM 151 0 0

  • 6 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. एक महानायक, प्रज्ञासूर्य, दीनदलितांचा, कोटी जनांचा आधारवड, महान तत्ववेता, थोर विचावंत, जागतिक उच्च विद्याविभूषित ज्ञानी नेता, राष्ट्रभक्त, भारतीय राज्य घटनेचे श्रेष्ठ शिल्पकार व महान घटनाकार हे आपल्यातून कायमचे दूर दूर निघून गेले तो हाच 6 डिसेंबर दुःखद दिवस.

आजही आठवण आली की डोळे अश्रूंनी डबडबून जातात. तर त्या काळात काय परिस्थिती असेल, याचा अंदाज करणे अशक्य आहे. असे सांगितल्या जाते. बाबासाहेबांची ही बातमी कानावर पडताच देश काय तर सारे जग सून्न झाले. सारा जनसमुदाय शोकसागरात बुडाला होता. त्यांच्या चाहत्यांनी तर जमीन आसमान एक केले होते. त्यांचे अनुयायी दुःखवेगानं मोठ्याने ओक्साबोक्शी रडत होते. महिला धरणीवर पडून रडत होत्या, लोळत होत्या. बाबासाहेबांचे पार्थिव मुंबईला येण्याची वार्ता पसरली होती.लोक मुंबई गाठण्यासाठी आतूर होते.

त्याकाळात प्रवासाची सोय नव्हती. जसे जमेल तसे लोक मुंबईच्या दिशेने निघाले होते. रेल्वेने, गाडीने, पायी चालत मुंबई कडे येत होते.
आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्राच्या व संपूर्ण जगाच्या सर्व भागातून लोक मुंबईत जमत होते. 7डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली. या अंत्ययात्रेत जवळजवळ दहा लाख लोकांचा शोकाग्रस्त जनसमुदाय उपस्थित होता. तो साश्रुनयनांनी हुंदके देत होता. ते जड दुःखी, अंतकरणाने एकेक पाऊल बाबासाहेबांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रक च्या मागे चालत होते. एक मुखाने बौध्द धर्माचे त्रिशरण म्हणाल्या जात होते. अंंतयात्रेत भिक्षु भदंत आनंद कौसल्यायन ही सहभागी झाले होते.
बुध्दं शरणम् गच्छामि
धम्मं शरणम गच्छामि
संघमं शरणम् गच्छामि
या आवाजाने सारे गगन दुमदुमून गेले होते.
ही महा अंत्ययात्रा सायंकाळी सव्वा पाच वाजता दादर चौपाटीवर पोहोचली होती. तेथे
वाळूच्या मोठ्या चौथर्‍यावर चंदनाच्या काष्टाची चिता तयार करून ठेवली होती. त्या चितेवर महान नेत्याचा तो देह अलगद ठेवण्यात आला होता. शोकाकुल महा समुदायाच्या साक्षीने सशस्त्र पोलीस दलाने बंदुकीने बार करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला मानवंदना दिली. बिगुलाचे गंभीर स्वर कानी पडत असताना यशवंतराव भिमराव आंबेडकर यांनी सव्वा सात वाजता आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी दिला. चहूबाजूंनी मोठ्याने रडण्याचा व हुंदके देण्याचा आवाज येऊ लागला.
जवळच प्रत्यक्ष महासागर होता.आणि ईकडे शोकात डुबलेला महा जनसागर होता. जळणार्‍या चितेकडे पहात पहात जो तो दुःखाने व्याकूळ होऊन रडत होता. तर रडत रडत कवींच्या लेखनी त्या प्रसंगावर लिहीत होत्या. कोणी कोणाला आवरावे, कोणी कोणाला सावरावे, कोणाला काही कळत नव्हते. जो तो आक्रोशाने थांबावलेला होता. अखेर महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी जीवन यात्रा पूर्ण करून संदेह पंचतत्वात विलीन झालेली होती. त्यांचे महापरिनिर्वाण होऊन जीवन सार्थक झाले. ते धन्य धन्य झाले…
बाबासाहेब यांच्या विषयी महती सांगताना वामन दादा एका ठिकाणी म्हणतात,
काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता,
लेकराला जशी माता भीम माझा तसा होता.

5 डिसेंबर हा बुधवार दिवस या दिवशी हा हितकारी प्रिय मित्र, ज्ञानी मार्गदर्शक असलेल्या आपल्या संग्रह ग्रंथांच्या सहवासात राहिला. आणि जमेल तशी ग्रंथ लेखन केले.. रात्रीच्या सव्वा बारा वाजेपर्यंत म्हणजेच गुरुवार 6 डिसेंबर या दिवसाची सुरुवात होईपर्यंत सुद्धा ते आपले प्रिय कर्म करीतच राहिले. आणि हे करीतच हा कर्मयोगी कायमचा झोपी गेला आणि चिरनिद्रेच्याच कुशीत गेला. जनसमुदायाचा हितकर्ता महापुरुष आता कधीही कुणालाही भेटू शकणार नाही अशा अभंग एकांतात गेला. अन्यायाविरुद्ध सतत धगधगणारा ज्वालामुखी धीर गंभीरपणे जगाचा निरोप घेऊन शाश्वत शांतीच्या आधीन झाला. हा सत्कर्मी एखाद्या गंभीर आजाराने अंथरुणावर खिळून राहिलेला नाही. ती कोणत्याही कारणाने निष्क्रिय होऊन राहिला नाही. हा महापंडित स्वस्थ मनाने राहुन आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत स्वीकृत कर्म एक निष्ठेने करीत राहिला. हा स्थितप्रज्ञ कुणालाही काहीही न सांगता न परतीच्या वाटेने कृतार्थ होऊन निघून गेला.

जनहितार्थ व देशहितार्थ जे जे करावयाचे होते, ते ते कृतकृत्य झालेला हा जननायक व राष्ट्रनायक आपले सर्वस्व त्यागुन निरपेक्ष वृत्तीने अदृश्य स्थळी निघून गेला.तो कोणाहीपुढे झुकला नाही, असा हा स्वयंभू आपल्या प्रघात ज्ञानाने उत्तुंग व विस्मयकारी कर्तुत्वाने पुढे मोठमोठ्यांना झुकवित अनंत यात्रेला निघून गेला. सदैव ताठमानेने, स्वाभिमानाने आणि बाणेदारपणाणे जीवन जगलेला हा महाप्रतापी जीवनाच्या अंतिम समयी भगवान गौतम बुद्ध यांच्या पुढे लीन झाला. आणि शांतपणे महानिर्वाणप्रत पोहोचला. हा महामानव कोणालाही कळू न देता मृत्यूचे स्वागत करून जीवन मुक्त झाला. आणि अज्ञाताच्या दिशेने भरारी घेत निघून गेला. हा दूरदर्शी मार्गदर्शक व अद्वितीय अस्पृश्योधारक आपल्या प्रिय जनांना स्वावलंबी, समर्थ, ज्ञानी,स्वोध्दारक, सुसंस्कृत, प्रतिष्ठित, संघटित, लढावू, बाणेदार,उन्नत, स्वातंत्र्य रक्षक, समतास्थापक आणि करुणामय होण्याचा महामंत्र देऊन प्रत्यक्ष पुनर्भेट न होईल इतका दूर दूर निघून गेला. भारतीय राज्यघटनेचा महान शिल्पकार स्वतंत्र भारताला लोकहितकारक लोकशाहीनिष्ठ संसदीय पद्धतीची राज्यव्यवस्था देवून कोणत्या तरी अनोळखी देशाला निघून गेला. आपल्या प्रभावशाली वक्तृत्वाने, उत्कृष्ट भाषाशैली भरपूर माहितीने आपला विषय समजावून संसदेला चकित करणारा हा संसद पटू अचानक राज्यसभेला कायमचा सोडून गेला. अस्पृश्यता व स्त्रियांना कायद्याच्या आधारे न्याय व सन्मान देऊन देऊन थोर हा विधीज्ञ व विवेकी समाजसेवक सर्वकाही सोडून गेला. अखिल मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित जीवन जगण्याच्या इच्छेने बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेला हा महामानव आकस्मात जग सोडून गेला. हा परम आदरणीय श्रेष्ठतम पुरुष एकाएकी निरंतर मौन धारण करून सकल प्रिय जनांना शोक सागरात लोटून गेला.
म्हणूनच लाखो अनुयायी चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करीत असतात.
पण आज जागतिक महामारीच्या संकटास तोंड देत आहोत, म्हणून प्रत्येकाची ही जबाबदारी आहे.आपण आपल्या घरुनच त्यांना अभिवादन करुया..
शेवटी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतांना एवढेच म्हणेल…

अरे सागरा भीम माझा तेथे
निजला शांत हो जरा…..अरे सागरा

बाबुराव पाईकराव
सहशिक्षक
बापुराव देशमुख मा.व उच्च मा. विद्यालय डोंगरकडा
मो. 9665711514

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *