जालना (प्रतिनिधी) ः एस. बी. आय. बँकेने शिवाजी चौक ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज चौक असा उल्लेख करावा अशी मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने आज शनिवारी एस. बी. आय. बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेवून या संदर्भात त्यांना निवेदन दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपुर्ण देशातील जनतेचे आराध्य दैवत असून जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या एस. बी. आय. बँकेने बँकेचा पत्ता दर्शवितांना शिवाजी चौक असा एकेरी उल्लेख केला असल्याचे आ. गोरंटयाल यांच्या निदर्शनास आले. एकेरी करण्यात आलेला उल्लेख हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असून त्यांच्यासारख्या महापुरूषांचा एकेरी शब्दात उल्लेख करून एस. बी. आय. बँकेने जनतेच्या भावनेला ठेच लावण्याचे काम केले आहे असा आरोप आ. कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. आ. गोरंट्याल यांच्या सुचनेवरून कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक जगदिश भरतीया, हरिष देवावाले, अशोक भगत तसेच पदाधिकारी अरूण घडलिंग, छोटू चित्राल, आनंद लोखंडे, निलेश बेनिवाल, योगेश माधववाले, अजय जाधव आदींच्या शिष्टमंडळाने एस. बी. आय. बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेवून त्यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. निवेदन स्विकारल्यानंतर बँक व्यवस्थापकांनी आपल्या भावना लवकरच एस. बी. आय. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत बँकेच्या पत्यात शिवाजी चौक ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज चौक असा उल्लेख केला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
Leave a Reply