नांदेड – भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला जीवन जगण्याची विचारधारा आणि तत्त्वज्ञान म्हणजेच बुद्धाचा धम्म आहे. तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील दोन शतकांत, सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धम्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धम्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये ईस्ट इंडीज सोबतच जगभरात पसरला. याबरोबरच बौद्ध संस्कृतीची रुजवण झाली. बौद्ध धर्म हा आपल्या जन्मस्थानापासून निघून जगभर पसरलेला जगातील पहिला धर्म होय. परंतु भारतातच या धर्माला ग्लानी आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगात महान असलेल्या बौद्ध संस्कृतीचे १९५६ ला पुनरुज्जीवन केले. बौद्ध भिक्षू आणि संघाच्या माध्यमातून ही संस्कृती भारतात जिवंत राहिली. ती टिकवून ठेवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीची आहे असे प्रतिपादन येथील धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी खडकमांजरी येथे केले. यावेळी भंते संघरत्न,भंते चंद्रमणी, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शिलानंद, भंते सुनंद, भंते संघमित्र, भंते सुमेध, भंते सुदत्त, भंते सुजात, भंते शिलभद्र, भंते सुगत, भंते सुयश, धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे संकल्पक गंगाधर ढवळे, धम्मसेवक निवृत्ती लोणे यांची उपस्थिती होती.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खुरगाव नांदुसा संचलित श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्राच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील धम्मसंदेश व धम्मदान यात्रेस प्रारंभ करण्यात आला आहे. त्याची सुरुवात अर्धापूर तालुक्यातील रोडगी येथून झाली. हा रथ खडकमांजरी ता. लोहा येथे (ता. १३) आल्यानंतर तेथील बौद्ध उपासक उपासिका शामराव वाघमारे, बाबुराव वाघमारे, माजी सरपंच सुकेशिनी वाघमारे, श्रुती वाघमारे, इशान वाघमारे, माजी उपसरपंच चांदू एडके, ग्रामपंचायत सदस्य आनंदा एडके, नितीन वाघमारे, दिलीप वाघमारे, पोलिस पाटील गौतम वाघमारे आदींनी स्वागत केले. भिक्खू संघाला वाघमारे परिवाराकडून भोजनदान दिल्यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप आणि पुष्प पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी धम्मदेसना देतांना प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बौद्ध धम्म हा निरीश्वरवादी, अनात्मावादी, समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी धर्म होय. गौतम बुद्ध यांनी मानवजातीला प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वांची शिकवण दिली. बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, करुणा, मैत्री, प्रज्ञा, मानवी मूल्ये, विज्ञानवाद या तत्त्वांचा पुरस्कर्ता आहे. आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचे समर्थन करणारा धर्म म्हणून बौद्ध धर्माला एक वेगळी ओळख मिळालेली आहे.
दरम्यान, भंते संघरत्न यांचीही धम्मदेसना झाली. ते म्हणाले की, मानवी जीवनात बौद्ध पद्धतीने जीवन जगत असतांना नीतीनियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. इतरांप्रती मंगल मैत्री, मंगल कामना ठेवून वागले पाहिजे. प्राणीमात्रांना प्रेम दिले पाहिजे. मनात द्वेषभावना ठेवून वागू नये. आचरण आणि वाणी शुद्ध ठेवावी. तरच आपण आपली बौद्ध उपासक उपासिका म्हणून ओळख कायम ठेवू. तसेच बौद्धांनी दस पारमिता पाळली पाहिजे. यावेळी त्यांनी दानाचे बौद्ध जीवनातील महत्व विशद केले. शामराव वाघमारे आणि सुकेशनी वाघमारे या दांपत्याने भिक्खू संघास फलदान, आर्थिक दान दिले. उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांनीही आर्थिक दान दिले. आशिर्वाद गाथेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गंगाधर ढवळे यांनी केले तर आभार निवृत्ती लोणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास एडके, मारोती वाघमारे, संतोष वाघमारे, दशरथ एडके, परमेश्वर वाघमारे, मारोतराव जोंधळे, गंगाधर जोंधळे, भीमराव वाघमारे, हरी एडके, लिंबाजी गायकवाड, किशन वाघमारे, नारायण वाघमारे, किशन मेकाले, मारोती हंकारे, निवृत्ती वाघमारे यांच्यासह तथागत मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सामाजिक सलोख्यासाठी एकतेने येथे नांदा!
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षेच्या माध्यमातून क्रांती घडवून आणली. आज समाजात झालेले अमुलाग्र परिवर्तन हे त्याचेच द्योतक आहे. परंतु सद्या देशभरात आरक्षण, अट्राॅसिटी आणि धार्मिक तुष्टिकरणावरुन वातावरण दुषित करण्यात येते. आजही पाण्यासाठी आंदोलन करावे लागते. मनात राग ठेवून बौद्ध समाजावर हल्ले होतात. हे थांबले पाहिजे. सोशल मीडियावरही असामाजिक तत्वांचा वावर वाढला आहे. दंगली घडवून आणण्यासाठीही हा मिडिया कारणीभूत ठरत आहे. बेधडक प्रतिक्रिया देण्यापेक्षा संयम ठेवावा. भारतीय लोकशाही एकतेला महत्व देते. विश्वबंधुत्व हे भारताचे वैशिष्ट्य आहे. सर्व धर्मियांनी सामाजिक सलोख्यासाठी एकतेने येथे नांदले पाहिजे. जातीय तथा वर्णवर्चस्व मानसिकतेतून जिथे अन्याय झाला असेल तिथे निकराने प्रतिकार करायला हवा, असेही पंय्याबोधी यावेळी म्हणाले.
Leave a Reply