ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खरं प्रेम

February 13, 202212:45 PM 80 0 1

फेब्रुवारी महिना म्हंटलं की, तरुणांचा उत्साह कसा ओसंडून वाहतो. व्हॅलेंटाईन डे ,चॉकलेट डे, प्रॉमिस डे, रोज डे असे कितीतरी डे या महिन्यात साजरे केले जातात .आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस किंवा ज्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेमाची भावना आहे ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा स्पेशल दिवस असं काहीतरी या दिवसाबद्दल मी ऐकलं आहे .
पण खरं प्रेम असं ठराविक दिवशीच व्यक्त करावे का? प्रेम या शब्दाचा अर्थ प्रेरित माया, अंतकरणातून आलेला हृदयाचा हुंकार, मनाला, तनाला रोमांचित करणारे वेगवेगळे आयुष्यातील क्षण ,मग आईच्या मायेने कुशीत शिरणारं लेकुरवाळं बाळ, आपल्या वासरासाठी गायीचं हंबरण, तारुण्याच्या वेलीवर फुलासारखं उमललेलं ,मिलनासाठी आसुसलेल्या दोन जीवांचं प्रेम, खूप दिवसांनी मुलाच्या येण्याच्या वाटेवर डोळे लावून बसलेल्या आईवडीलांचे प्रेम, आजारपणात मृत्यला हरवून जगण्यावर प्रेम करणारे ते प्रेम,आयुष्याच्या संध्याकाळी सोबत एकमेकांना आधार देत हात हातात धरून सुरकुतलेल्या चेहऱ्यावरती उमटणारे हास्य म्हणजे प्रेम, माणूस म्हणून जगताना, वावरताना उघड्यावर पडलेल्या लेकरांसाठी, वृद्धांसाठी, गरजू साठी संवेदना जागवणारं, मदतीचा हात पुढे करणार ते प्रेम.
प्रेम हे मनापासून असावं ते फक्त एका वळणावर हात धरून प्रेमाच्या आणाभाका करून अवघड क्षणी सोडून जाणारं नसावं. ते दोघांच्या विचाराने असावं. प्रेम ,वात्सल्य ,माया, ओढ, काळजी, संवेदनशीलता, संयम, सहनशीलता अशा शब्दांच्या मोती माळेत ते गुंफलेलं असावं. नाहीतर कधी कधी प्रेमाचा चुकीचा अर्थ काढला जातो. माझ्या मनातील भावना दुसऱ्या व्यक्तींनी स्वीकारल्या नाहीत म्हणून तो प्रेमभंग समजला जातो आणि त्यातून सूडाची भावना निर्माण होते. अनेक हिंसक प्रकार यातून घडतात. विशेषत अनेक तारुण्यातील मुलींना,महिलांना याचा सामना करावा लागतो. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते.ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीला संपवण्याचा प्रयत्न करतो हे खरे प्रेम आहे का? तर नाही ती असते फक्त पिपासू वासना. म्हणून त्याचा कुठेतरी विचार व्हायला हवा. प्रेमाचा अर्थ आधी समजून, उमजून घ्यायला हवा.
मानवी जीवनात अनेक नाती असतात. आजी ,आजोबा, आई, वडील मित्र-मैत्रिणी ,बहिण भाऊ,तर अनेक नाती जोडलेली असतात की ,जी रक्ताच्या नात्यापेक्षा आपल्याला जवळची वाटत असतात. आपण या सर्व नात्यावर मनापासून प्रेम करत असतो .पण रोजच्या जगण्याच्या धडपडीत कुठेतरी या प्रिय व्यक्तींबरोबरचा संवाद हरवला जातो .कधी कधी आपल्याच नात्यांची आपण कदर करत नाही. त्यांच्यासाठी वेळ देत नाही. जाता येईल, भेटू नंतर, करेन सवड झाल्यावर फोन, यातच दिवस निघून जातात. कधीतरी रिकाम्या वेळेत विचार करतं बसल्यावर अनेक भावनांचे, नात्यांचे पदर नजरेसमोर येतात. अरे आपलं हे करायचं राहूनच गेलं की, चूक झाली आपली आणि अशा वेळी आपण स्वतः पश्चाताप करतो. पण तो नात्यांचा धागा तसाच घट्ट असेल का? हे मात्र काही सांगता येत नाही. त्यातलं एखादं पान गळून गेलेलं असतं. तर काही नाती दुरावलेली असतात. म्हणून मनाच्या कोपऱ्यात आपल्या माणसांसाठी नेहमी जागा राखून ठेवा. त्यांच्यासाठी वेळ द्या .त्यांच्यावर मनापासून प्रेम करा.वाऱ्यावर हळुवार उडणाऱ्या मोरपिशी पंखासारखं आपलं आयुष्य ही हळू हळू पुढे जात आहे. प्रेम द्या, प्रेम घ्या.

लेखिका-रंजना सानप
मायणी (सातारा)
मोबाईल नंबर-९०४९५४८३२३

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *