एकमेकांना गुदगुल्या करताना तोल गेल्यामुळे छतावरुन पडून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीमध्ये घडली आहे. दोघांनाही उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण त्यांचा जीव वाचू शकला नाही. रविवारी (दि.२४)दुपारी दिल्लीच्या गीता कॉलनी परिसरात ही घटना घडली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एकाच फॅक्टरीत काम करणारे दोघं मित्र रविवारी दुपारी फॅक्टरीच्या छतावर जेवण करायला गेले. जेवताना ते थट्टा-मस्करी करत होते. पण, थोड्यावेळाने त्यांनी एकमेकांना गुदगुल्या करायला सुरूवात केली आणि तोल जाऊन ते छतावरुन खाली पडले.
शफिक आणि शकिल अशी दोघा मृतांची नावं असून दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते. पत्नी आणि अन्य कुटुंबियांसोबत शफिक दिल्लीच्या जाफराबाद परिसरात वास्तव्यास होता. तर, शकिलचं घरही त्याच्या जवळच आहे. दोघंही विकास दुआ नावाच्या बिजनेसमनच्या रेडीमेड कपड्यांचा कारखान्यात कामाला होते. दरम्यान, कारखान्याच्या छतावर फक्त पायऱ्यांसाठी दरवाजा असून छताला कोणतीही सुरक्षा भिंत नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. प्रमाणापेक्षा जास्त दंगा-मस्ती कधी-कधी जीवावर बेतू शकते हेच या घटनेमुळे अधोरेखीत झालंय.
Leave a Reply