ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

संयुक्त महाराष्ट्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

May 2, 202113:19 PM 110 0 0

आज एक मे हा महाराष्ट्र दिनाचा 61 वा वर्धापन दिन आणि जागतिक कामगार दिन आपण साजरा करत आहोत. आजच्या दिनाचे महत्त्व म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती हे होय. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हर्षोल्हासात तिरंगा ध्वज उभारुन आपण साजरा करीत असतो. म्हणून त्या दिनाचे महत्त्व फार महान आहे. या दिनाला महत्त्वपूर्ण अशी एक गौरवशाली ऐतिहासिक किनार लाभलेली आहे. हा मंगलमय दिवस उजाडण्यासाठी मराठी मानसांना फार मोठा संघर्ष करावा लागला. या संघर्षामध्ये आमच्या 106 वीरांना बलिदान द्यावे लागले. म्हणून यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटन मुंबई येथे स्मारक उभारण्यात आले.वीरांच्या बलिदानतून उगवलेला सुवर्ण दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन होय. त्या थोर वीरांच्या कष्टांचे आणि त्यांच्या अथ्थक प्रयत्नांचे यशस्वी अवीट गोडी देणारे हे फळ आहे. आम्ही या अमृत फळाचा स्वाद घेत आहोत. पण तद्वतच ही गोडी चाखताना आपल्या विशाल गौरवशाली पुरोगामी संयुक्त महाराष्ट्राचे वैभव टिकवण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे.

महाराष्ट्राचा हा संघर्ष 1938 साली सुरू झाला. मुंबई शहर हे अंडी देणारी कोंबडी होती. मुंबई कुणाची भांडवलदारांची आणि अमराठीवाल्यांची की महाराष्ट्रीयन लोकांची. हा संघर्ष विकोपाला पेटला. आणि ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे’ ही मागणी जोर धरू लागली. या आंदोलनामध्ये सर्व उपेक्षित शोषित कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांनी एकत्र येऊन लढा दिला होता. यामध्ये काँ. डांगे, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे,माधवराव बागल, शे.का.फे.दादासाहेब गायकवाड ,बी सी कांबळे, दादासाहेब रुपवते यांनी अनमोल असे योगदान दिले. आपल्या शाहिरी प्रबोधनातून लोकांचे जनजागरण करण्याचा प्रयत्न शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना जागे केले.

ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. दादर येथील त्यांच्या राजगृह या निवासस्थानी मार्गदर्शनपर प्र. के. अत्रे, काँ डांगे, एस.एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, त्यांच्या सहचर्चा होत असत. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी भांडवलदार आणि अमराठी यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीने जोर पकडला होता आणि त्याच वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 ला एक पत्रक प्रसिद्ध करून केंद्र सरकारचा मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्याला विरोध केला.

मुंबईवर हक्क कोणाचा?

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची अस्मिता आहे. हे सर्व जण मान्य करीत होते. पण ती का व कशी? याबद्दल मात्र कुणीच काही बोलत नव्हते.

त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मुंबईचे खरे वारसदार कोळी आहेत.. कलकत्त्याला बंगाल्यांचा, मद्रासवर तामिळांचा हक्क पोहचतो तर मुंबईवर महाराष्ट्रीयांचा हक्क का पोहोचू नये.?

प्र.के.अत्रे यांनी त्यांच्या ‘मराठा’ या दैनिकातून या चळवळीचा जोरदार आवाज उठवला तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ‘जनता’ या वृत्तपत्रातून आपले विचार जनमानसात रुजूविले.

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन ही स्वातंत्र्य चळवळीनंतरची महाराष्ट्रातील व्यापक लोकसमर्थन असणारी चळवळ होती. हे राज्यातील पुरोगामी चळवळीचे मोठे व्यापक आंदोलन होते.

अखेर 1मे 1960 चा दिवस उजाडला. आणि गुजरात व महाराष्ट्र ही दोन राज्य उदयास आली.आणि मुंबई महाराष्ट्राला जोडण्यात आली. त्याबरोबरच संयुक्त महाराष्ट्र समिती बरखास्त करण्यात आली. गुजरात राज्याचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केले तर महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरू यांनी केले. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा मान मा.यशवंतराव चव्हाण यांना मिळाला.

आजच दुग्धशर्करा योग म्हणजे जागतिक
कामगार दिन होय.या दिनाचे महत्त्व सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने समोर येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी बहूमोलाची कामगिरी पार पाडली. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करून कामगारांचे हित साधले. त्यांना हक्क आणि अधिकार देवून त्यांना न्याय दिला.

बाबासाहेबांनी कामगारासाठी महत्वाचे कायदे पास केले.
शेतकऱ्यांसाठी किमान वेतन दर असावेत.अशी विधिमंडळात मागणी केली.
1937 साली कोकणातील बहुजन कामगारांचे शोषण थांबण्यासाठी खोतीपद्धत नष्ट करण्यासंबंधी बिल मांडले. बिडी कामगारांना न्याय दिला.

कामगारांना
संप करण्याचा कायदेशिर अधिकार मिळवून दिला.
1938 मध्ये सावकारी नियंत्रण विधेयक तयार केले.
सेवायोजन कार्यालयाची स्थापना केली. कामगारांना पगारी रजेचे विधेयक मंजूर केले.
अन्न,वस्त्र, निवारा, शिक्षण आणि सांस्कृतिक गरजा व आरोग्याचे उपाय तसेच कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी यावरील ठराव संमत केले.

महागाई भत्ता, बेकारीच्या काळातील नुकसान भरपाईची पद्धत, राजीनामा मजूर खात्याचा नोकरवर्ग, कोळशाचे उत्पादन प्रश्न यावर त्यांनी भाष्य केले. एवढेच नाही तर स्त्रियांबाबत विशेष कायदे करुन स्त्री कामगारांचे हित जोपासले. प्रसूतीच्या काळात विश्रांतीची तरतूद, रोख मदत, किमान चार आठवडे प्रसूतीच्या काळात भत्ता मिळावा म्हणून तरतूद केली. गैरहजर काळात भर पगारी रजा मंजूर केली.
कामाचे तास आठ करण्यात आले. त्यांच्यावर अन्याय होत असेल तर संप करण्याचा अधिकार मिळवून दिला.

बाबासाहेबांनी जे कार्य केले तेपूर्ण भारतीय समाज साठी आहे.हे बहुमूल्य योगदान पाहता आज कामगाराची सुस्थिती दिसत आहे. त्यात बाबासाहेबांचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे म्हणून बाबासाहेब हे सर्व कामगारांचे आदर्श आहेत.

त्यांच्या या महान कार्याला आज कोटी कोटी प्रणाम….

 

 

– बाबुराव पाईकराव
डोंगरकडा ता. कळमनुरी
मो. 9665711514

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *