नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात गॅंगवारचा दुसरा विक्की बळी ठरला. आज विक्की ठाकूरला गाडीपुरा भागात कांही युवकांनी गोळीबार करून खून केल्याचा प्रकार सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास घडला. गॅंगवारमधील एका विक्की चव्हाणचा खून जवळपास एक वर्षा अगोदर झाला होता. त्याचा साथीदार असलेल्या दुसरा विक्कीचा खून आज झाला आहे. खून होण्यापेक्षा खून करण्यामध्ये हिंमत दाखवून आपली दहशत पसरविणाऱ्यांना पोलीसंानी गजाआड करायला हवे. तरच गॅंगवार संपुष्टात येईल.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 7 वाजता गाडीपुरा भागात रेणुका माता मंदिराच्या पुर्व दीक्षेकडे असलेल्या एका गल्लीतून आत जाणाऱ्या रस्त्यावर विक्की दशरथसिंह ठाकूर यावर दोन दुचाकी गाड्यांवर आलेल्या सहा युवकांनी हल्ला केला. या हल्यात विक्की ठाकूरच्या डोक्यावर एक गोळी लागली. तीन गोळ्या हवेत झाडण्यात आल्या. विक्की ठाकूर खाली पडल्यानंतर सहा युवकांपैकी कांही जणांनी त्याच्या शरिरावर तलवारीने अनेक घाव केल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकप्रमुख आणि अनेक पोलीस अंमलदार घटनास्थळी हजर झाले. रात्री 8.30 वाजता मयत विक्की ठाकूरचा मृतदेह वैद्यकीय परिक्षणासाठी पाठविण्यात आला. कांही जणांनी सांगितले की, काळे कपडे घातलेले तीन युवक होते, दोन युवकांनी पांढरे कपडे घातले होते. विक्की ठाकूर बाबतची माहिती घेवून त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे असे त्या घटनेवरुन दिसते.
जवळपास एक वर्षापुर्वी विक्की चव्हाण नावाच्या एका युवकाचा खून झाला होता. त्या प्रकरणात कैलास बिघानीया हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यासोबत जवळपास 15 जणांना अटक करण्यात आली आहे ते सध्या तुरूंगात आहेत. विक्की ठाकूर हा विक्की चव्हाण याचा जवळचा मित्र आहे. कैलाश बिघाणीया आणि विक्की चव्हाण यांच्या आपसातील द्वंद बऱ्याच दिवसांपासून सुरू होते. त्यातून विक्की चव्हाणचा खून झाला. आता कैलाश बिघाणीया तुरूंगात आहे तरी पण त्याच्या मित्रांनी विक्की ठाकूरचा खून करून दुसरा खून केला आहे. एकूणच आज झालेला गोळीबार म्हणजे शहरात बंदुका सहज उपलब्ध आहेत. काही ठीकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांना प्राप्त झाले आहेत.मारेकरी मंडाळीचा शोध सुरु आहे
Leave a Reply