ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 वारकरी भजनात स्वरांचा उत्सव होतो – महेश काळे

January 15, 202213:23 PM 40 0 0

खरे तर आपले वडीलधारे ज्या व्यासपीठावर असतात तिथे आपण उभेही राहू नये अश्या परंपरेतला मी आहे. रिंगेमहाराजांबद्दल काही बोलायची माझी पात्रता नाही. माझ्या आयुष्यापेक्षा ज्यांच कार्य जास्त आहे. त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य मिळालं. असे भावपूर्ण उदगार राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांनी काढले. वारकरी संप्रदायातील थोर गायक ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज यांना ऐंशी वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे ज्येष्ठ भाजनसाम्राट अनुप जलोटा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. काळे पुढे असेही म्हणाले की, वारकरी संप्रदायाने सांस्कृतिक वारसा जपण्याचं खुप मोठं काम केलं आहे हे मी अधिकार वाणीने हे सांगू शकतो, कारण दोन तीन वर्षाचा असल्यापासून मी भजन मंडळात मागे बसून भजन ऐकत टाळ वाजवत मोठा झालो आहे.

भजन चालू असताना असे वाटत होते कि आपणसुद्धा टाळ घेऊन भजनात बसावे. वारकरी भजनात फक्त गायन न होता स्वरांचा उत्सव होतो. आज रिंगे महाराजांचा जो गुणगौरव सोहळा होत आहे त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला त्यांच्या शताब्दी सोहळ्याला बोलावा अशी विनंती करतो. यावेळी अनुपजी जलोटा म्हणाले की, हरिभाऊ महाराज माझ्यासाठी आदरणीय व्यक्ती आहेत, ६० वर्षाची साधना केलेली ही व्यक्ती फार मोठया ताकदीचे कलावंत आहेत, त्यांच्या साधनेसमोर मी मला फारच लहान गायक कलावंत समजतो. त्यांचा सत्कार करण्याचे मला भाग्य मिळाले हे माझे संचित असावे. त्यांना घातलेल्या वजनदार हाराचा त्रास होऊ नये यासाठी मी तो श्रद्धेने हाताने वर उचलून घेतला, त्यांचे दर्शन घेतल्यानंतर मिळणारा आशीर्वाद माझे भाग्यच होय. तर ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे आपले विचार मांडताना म्हणाले की,
सूर हे सुरच असतात तर शब्द हे असुर असतात, ज्या माणसाने साठ वर्षची संगीत साधना केली आणि हे सुरानो चंद्र व्हा असे म्हणत ८० वर्षें जीवन जगले आहेत त्यांच्या सहस्रचंद्र दर्शनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणे मी माझे भाग्य समजतो. वारी, वारकरी परंपरा हे महाराष्ट्राचे आठशे वर्षाचे संचित आहे, थोर विदुषी इरावती कर्वे यांनी लिहुन ठेवलेय, ज्या प्रदेशातले लोक वारी करतात तो महाराष्ट्र. मराठी माणसाने विठ्ठलाच्या वरचे प्रेम नेहमी अभंग गायनातून व्यक्त केले आहे. वारकरी सांप्रदायाने सर्वसामान्य माणसाला जगण्याचे आत्मबळ दिले त्यातून संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आदी संतांची मांदियाळी निर्माण झाली. जसे शिवछत्रपती निर्माण झाले. त्याचप्रमाणे पुढच्या काळात असंख्य वीर आणि समाजसुधारक निर्माण झाले. गेली अनेक शतके देशाच्या पातळीवर महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले आहे आणि त्याचे सारे श्रेय वारकरी परंपरेला जाते, पद्मश्री मिळाल्यानंतर सिने कलाकारांनाच प्रश्न पडतो, की मला हा पुरस्कार का मिळाला ? अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारने हरिभाऊंच्या निष्काम सेवा आणि साधनेचा गौरव पद्मश्री देऊन करावा असे मत ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी नादब्रम्ह विशेषांक, नादवेध दिनदर्शिका, वारकरी दर्पणच्या हरिभाऊ रिंगे विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. अभंगनाद या भजनसंध्या कार्यक्रमात गायक गणेश कळंबे, सागर उतेकर, सतिष कळंबे, ज्ञानेश्वर कदम, गणेश कुलये, सीतारामबुवा कळंबे, युवराज कळंबे, अविनाश रिंगे, चिन्मय रिंगे तर पखवाज वादन सुप्रसिद्ध मृदंगमणि सुनिल मेस्त्री आणि बंडाराज घाडगे यांनी केले. बंडाराज घाडगे यांनी केले, तर सूत्रसंचालन संतसाहित्याचे अभ्यासक आणि वारकरी दर्पणचे संपादक सचिनमहाराज पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन ईश्वरी मल्टिग्राफिक्सच्या वतीने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय घावरे यांनी केले होते. राजू रिंगे, ज्ञानोबा दाभेकर, योगेश रिंगे, आदेश महाराज रिंगे, निखिल मालुसरे, ओमकार घावरे यांनी विशेष मेहनत घेतली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *