विशाळगडावरील 21 हून अधिक मंदिरांचा विकास न होता त्यांचा आकार कमी झाला, त्या जागेवर अतिक्रमण झाले, या खूप गंभीर गोष्टी आहेत. याविषयी माननीय मुख्यमंत्र्यांशी सविस्तर बोलेन, तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना सूचित करून सर्वांची एकत्रित बैठक घेऊन गडावरील अतिक्रमण काढण्याविषयी जिल्हाधिकार्यांना योग्य ती पावले उचलण्यासाठी स्वतः सांगेन. यासह राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून पन्हाळा ते विशाळगड या ऐतिहासिक मार्गाचे जतन होण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावणे, मार्ग चांगला करणे, त्याचे महत्त्व सर्वांना समजण्यासाठी पन्हाळा रणसंग्रामाचे एक भव्य शिल्प उभे करणे, विशाळगडावरील सर्व दुर्लक्षित हिंदू मंदिरे, नरवीरांच्या समाधी, ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी राज्य नियोजन मंडळातून स्वतंत्र निधीची तरतूद करू आणि एक वर्षांच्या आत हे काम पूर्ण करू, असे आश्वासन ‘राज्य नियोजन मंडळा’चे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले.
‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या शिष्टमंडळाने 20 मार्च या दिवशी श्री. राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांना विशाळगडावर झालेले अतिक्रमण, मंदिरांची झालेली दुरवस्था आदी समस्या मांडत निवेदन सादर केले. त्या वेळी हे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी ’विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ता श्री. सुनील घनवट, समन्वयक श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री, श्री. बाबासाहेब भोपळे, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘विशाळगडावर झालेले अतिक्रमण, तसेच तेथील नरवीरांच्या समाध्या आणि मंदिरांच्या करता काय येइल ते पहाण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. तसेच प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी निर्माण केलेल्या खात्याचे मंत्री श्री. एकनाथ शिंदे, पुरातत्व खाते, तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशीही चर्चा करेन.’’
’विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने नुकतेच याविषयी पत्रकार परिषद घेऊन नंतर राज्यव्यापी आंदोलन केले होते, तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली होती.
Leave a Reply