ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लोक काय म्हणतील ?

July 28, 202115:54 PM 83 0 0

आपल्याला माहित आहे का, सर्वात मोठा रोग कोणता आहे ? हा रोग म्हणजे लोक काय म्हणतील ? प्रत्येक माणसाची दोन रुपे असतात, एक त्याचे खरे रुप ज्याला तो फक्त स्वत: जाणतो आणि दुसरे रुप जे तो लोकांसाठी जगतो. पहिले रुप हे बालवयातच उत्पन्न होते. ज्यात ना कशाची चिंता असते, ना भिती. या वयात काहीही करण्याची तयारी असते. काही तरी नविन शिकण्याची ईच्छा आणि उमेद असते. पण व्यक्ती जस-जशी मोठी होत जाते तस-तशे स्वत:च्या विचारांचे दमन व्हायला सुरुवात होते आणि हळू-हळू लोक आपले विचार थोपवायला सुरुवात करतात. काळाच्या ओघात व्यक्तीचे बालपणीचे पहिले रुप कुठेतरी लुप्त होते आणि दुसरे रुप उदयाला येते जे लोकांच्या विचारानूसार असायला हवे. मग ती प्रत्येक वेळी वागताना, बोलताना एकच विचार करायला लागते, लोक काय म्हणतील ? कधी-कधी तर लोकांच्या काही म्हणायच्या अगोदर व्यक्ती स्वत:च लोक काय म्हणतील ? हे ठरवते. मी कोण आहे, मला काय हव, मी काय बनू ईच्छीतो हे सगळ विसरून लोकांच्या मतानूसार जगायला सुरुवात करते. आपल्यातील ९० टक्के लोकांना यामुळे कधी जीवन जगण्यातील ख‌-या आनंदाला तर कधी मोठया यशाला मुकावे लागते.


मी अशा अनेक लोकांना भेटलो आहे जे आयुष्यात काही तरी वेगळे करु ईच्छीतात पण त्यांच्या मार्गात एकमेव अडथळा असतो ते एकच वाक्य – लोक काय म्हणतील ? अरे लोक तेंव्हाही म्हणतील जेंव्हा आपण काहीच करणार नाहीत. जग हे दोन्ही बाजूने म्हणत असते. पावसाळ्यातील पहिल्या पावसाच्या सरी पडायला सुरुवात झालेली असते, आपल्याला या पावसात मनसोक्त भिजावे वाटते, रस्त्याने एखादी वरात जात असते, लोक गाण्याच्या ठेक्यावर थिरकत असतात, आपल्यालाही वाटत की त्यात सामिल होवून थोडा आनंद घ्यावा पण लोक काय म्हणतील ? हा विचार मनात आला की, सगळ तिथच थांबून जात. लोक काय म्हणतील ? याचा संबध हा लोकलज्जेशी आहे. आपल्याला उगाच वाटत असत की, लोकांच आपल्याकडे खूप लक्ष आहे, ते सतत आपल्या बाबतीत विचार करतात. खरं तर आपणच लोकांच्या बाबतीत जरा जास्तच विचार करत असतो. जर आपण लोकांच्या मतानूसार वागत असताल तर सर्व काही ठिक असत, पण जर आपण काही जगा वेगळ करण्याचा प्रयत्न केला किंवा आपली जेवढी क्षमता आहे किंवा स्वप्न आहे त्यानूसार पाऊलं उचलली तर लोक आपल्याला वेडा म्हणायला सुरुवात करतात आणि आपण करत आहोत ते योग्य आहे की अयोग्य याचा विचार न करता भिवून थांबतो. खरंतर आपण निवडलेला मार्ग हा आपल्याला यशाकडे घेवून जाणारा असतो. आपल आयुष्य हे लोक काय म्हणतील ? या विचाराने तसच निघून जात. मग आपल्याला जस हव तस आपण आयुष्य खरच जगतो का ? मला एक गीत आठवते, ‘‘ कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है कहना ’’. लोकांच काय दोन्ही बाजूने नावे ठेवतात. जरा विचार करा की, आपण आपल्या मुलांचा खूप लाड करित असताल तर लोक म्हणतात की, एवढा नका लाड करू मुले डोक्यावर बसतील आणि जर आपण लोकांचे म्हणणे मानून जर मुलांना रागावण्यास सुरुवात केली तर हेच लोक म्हणतात की, बघा कसा बाप आहे मुलांना सारखा रागावतो, त्यांच्यावर जराही प्रेम करत नाही. आपण जर आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत असताल तर लोक म्हणतात की, हा बायकोच्या खूप अधिन गेला आहे आणि जर तिच्याकडे लक्ष दिले नाही तर हेच लोक म्हणतात की, बघा ही मुलगी आपले घर सोडून याच्या मागे आली आहे आणि हा तिची जराही काळजी घेत नाही. आपण एखादे काम करित असताना काही लोक आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देवून प्रोत्साहन देतात तर बरेच लोक हे नकारात्मक विचार व्यक्त करणारे असतात. आपण मात्र नकारात्मक बोलणा-यांचा गंभीरतेने विचार करतो आणि आपला उत्साह न जाणो कुठे निघून जातो. ज्या व्यक्तींनी लोक काय म्हणतील ? याचा कधीच विचार केला नाही, आपल्यातील बालपण जिवंत ठेवले किंवा आपल्या मतावर ठाम राहिले त्यांनी इतिहास घडविण्याचे काम केले आहे. यासाठी आपल्याला बरीच उदाहरणे घेता येतील. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या वेळी मुलींच्या शिक्षणाचे व्रत हाती घेतले होते त्यावेळी तत्कालिन समाजाने त्यांना खूप विरोध केला होता, मात्र लोक काय म्हणतील याचा त्यांनी विचार न करता आपले कार्य तसेच पूढे चालू ठेवले. आज मात्र त्यांनी केलेल्या कार्याचे महत्व आपल्याला पटले आहे. संत गाडगे बाबांनी ज्या वेळी हाती झाडू घेवून स्वच्छतेचे काम हाती घेतले त्यावेळी लोकांनी त्यांना वेडा ठरवले असेल कदाचित. आज मात्र आपण त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान राबवतो. काही विचार हे समाजात रुजलेले नसतात त्यामुले जर कुणी वेगळी वाट धरली तर साहजिकच लोकांचा विरोध हा होतोच, लोक नावं ठेवायला लागतात. मात्र हेच लोक नंतर म्हणायला लागतात की, आम्हाला माहित होते


की, हा जरूर पूढे चालून खूप नाव कमावणार. आता महावीर सिंग फोगाट यांचेच उदाहरण घ्या. हरियाणात ज्या वेळी मुलींची कुस्ती म्हणजे चेष्टा समजली जायची अशा काळात लोक काय म्हणतील ? याचा कसलाही विचार न करता त्यांनी आपल्या दोन्ही मुली बबिता आणि गिता यांना कुस्तीचे प्रशिक्षण देवून मैदानात उतरविले. या मुलींनी नंतर मात्र इतिहास घडवला. बबिता फोगाट हिने २०१० च्या कॉमन वेल्थ गेम मध्ये भारतासाठी कुस्तीत गोल्ड मेडल पटकावले आणि पूढेही भारताला अनेक पदके मिळवून दिली. त्यांची दुसरी मुलगी गीता फोगाट हिने ही अशीच कामगिरी भारतासाठी कुस्तीत केली आहे. याच राज्याच्या सुखबिर मलिक यांनी आपली मुलगी साक्षी मलिक हिला कुस्ती या खेळात प्रोत्साहन दिले ज्यामुळे तिने २०१६ च्या रिओ ऑल्मपिक मध्ये ५८ किलो ग्रँम गटात भारताला कास्य पदक मिळवून देवून भारताची लाज राखली. मी अशी बरीच माणसे बघीतली आहेत जी लोक काय म्हणतील ? याचा विचार न करता आपलेमत मांडतात किंवा आपले कार्य करित राहतात. दिवंगत अभिनेते ओम पुरी हे आपल्या सडेतोड मतांसाठी ओळखले जात. त्या पाठोपाठ अभिनेत्री कंगना राणावत हिचे नाव येते. इथे अंबाजोगाईत धीमंत राष्ट्रपाल नावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी घातलेल्या पांढ-या पेहराव्यावर व टोपीवर बेटी बचाव अभियानाशी संबंधित वाक्ये लिहिलेली असतात. गेली अनेक वर्षे त्यांच्या अंगावर हाच पेहराव आहे. भल्या सकाळी हा माणूस मुलगी वाचवा म्हणून मोटार सायकलीवर घोषणा देताना मी ब-याच वेळा पाहिले आहे. नवखी लोक त्यांच्या या पेहराव्याकडे विचित्र नजरेने पाहतात. ते म्हणतात की, सुरवातीला अनेक लोकांनी त्यांना ही नावे ठेवली, लोक हसायची, वेडा म्हणायची.मात्र लोक काय म्हणतील ? याची तमा न बाळगता त्यांचे हे कार्य 'लोक जागर' या संस्थेमार्फत सतत सुरू आहे. आता ते अनाथ, वंचित, उपेक्षित मुलींसाठी काम करीत आहेत. आज त्यांना नावे ठेवणारी हिच लोक त्यांचा सत्कार अनेक ठिकाणी करतात. त्यांचा अनेक पुरस्कार देवून समाजाने गौरव ही केला आहे. लक्षात घ्या काळ बदलला की, लोकांची मते ही बदलत असतात. लोक ही प्रत्येक परिस्थितीत बोलत असतात. आपल्याला लोक काय म्हणतील ? याचा विचार न करता आपण आपले काम करित राहिले पाहिजे.
– सुरेश मंत्री, 
 अंबाजोगाई – ९४०३६५०७२२

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *