ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ऑनलाईन शिक्षण योग्य की अयोग्य

July 18, 202114:21 PM 65 0 2

“शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास” अशी सर्वमान्य व्याख्या आहे.शिक्षण ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे.यामध्ये विद्यार्थी-शिक्षक-पालक हे सर्वात महत्वाचे घटक आहेत.प्राचीन काळापासून शिक्षणामध्ये *शिक्षक व विद्यार्थी हे नाते पवित्र व महत्वाचे मानले जाते*. आजही ते तेवढेच महत्वाचे आहे.आधुनिक जगात तंत्रज्ञानाच्या बाबतीत कितीही प्रगती केली तरी *एखादी मशीन हाडामासाच्या शिक्षकाची जागा घेऊ शकणार नाही* कारण शिक्षण हे शिक्षकाच्या फक्त शब्दातूनच दिले जात नाही तर शिक्षकांचे हावभाव,शिक्षकाचे सामान्य स्थितीतील वर्तन,डोळ्यातील भाव,आणि सर्वात महत्वाचं प्रत्यक्ष समोरासमोर एकमेकांना समजून घेणं.या सर्वमधून होत.या सर्व बाबी विद्यार्थ्यांना प्रेरित करतात त्यांचं व्यक्तिमत्व घडवतात.म्हणून ऑनलाईन शिक्षण हे काही किंवा विशिष्ठ स्तरावरील विद्यार्थ्यांना माहिती देईल,ज्ञान देईल पण शिक्षण देऊन व्यक्तिमत्व विकास करणार नाही असे मला वाटते.म्हणून *मला ऑनलाईन शिक्षण अयोग्य वाटते.
कारण ही तसेच आहे,मी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्याना अध्यापन करते आणि माझ्याकडे गेल्यावर्षी पहिलीचा वर्ग होता. इयत्ता पहीली म्हणजे संपूर्ण शिक्षणाचा पायाच. या इयत्तेत जर पाया कच्चा राहिला तर त्याचे सर्व परिणाम पुढच्या इयत्तेत दिसून येतात. वाचन,लेखन, अंकज्ञान या गोष्टी या इयत्तेत पक्क्या व्हाव्या लागतातच त्याचबरोबर चांगले संस्कार व चांगल्या सवयीसुद्धा लागव्या लागतात*. शैक्षणिक विषयांचा भरपूर सराव ही घ्यावा लागतो. साधारणतः फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व अभ्यासक्रम पूर्ण होतो आणि मार्च महिना त्याचा सराव घेता येतो तसेच आपण केलेल्या संस्काराचे व सवयीचे मूल्यमापन करता येते.
पण 16 मार्च 2020 पासून कोरोनाच्या महामारीमुळे शाळा बंद झाल्या आणि संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले.सगळीकडे कडेकोट टाळेबंदी झाली ती आजअखेर आमच्या पहिली ते चौथी शाळा बंद आहेत.
शैक्षणिक वर्ष 2020-21 दिनांक 15 जुन 2020 ला सुरू झाले. सगळीकडे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले.पहिल्याच दिवशी मी शाळेतील मुलांना शासनाकडून मिळालेली नवी कोरी पुस्तक वाटप केली पण शाळा मात्र सुरू झाली नव्हती फक्त शैक्षणिक वर्ष सुरू झाले होते.
कारण कोरोनाचे संकट आ वासून उभे होते. सगळीकडे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले होते.विविध वर्गाचे व्हाट्स अप ग्रुप तयार होत होते. पण माझं ऑनलाइन शिक्षण बंद होत त्याला कारणही तसंच होत. ते म्हणजे *अँड्रॉईड मोबाईल*..मी ज्या वस्तीवर काम करते ती बेघर वस्ती आहे. मी सर्वेक्षण केलं तर फक्त 5 % लोकांकडे अँड्रॉइड मोबाइल होता. मग माझ्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण कसे सुरू होईल . ही परिस्थिती मी जिथे काम करते त्या वस्तीवरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात अशा कितीतरी वस्त्या असतील की जिथे लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसेल.खरं तर ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे. काही पालक असे सुद्धा आहेत की मोबाईल असेल तरी तो विद्यार्थ्यांच्या हातात देतील असे नाही. तो खराब होईल, बिघडेल किंवा मोबाईल मला पाहिजे मी बाहेर जाणार आहे,मी रात्री उशिरा घरी येणार आहे अश्या असंख्य कारणाने मुलांच्या हातात मोबाईल दिला जात नाही.
जवळजवळ 15 ऑगस्टपर्यंत आमचं ऑनलाईन शिक्षण सुरू नव्हतं.माझ्या शाळेचा मुख्याध्यापक चार्ज माझ्याकडे असल्याने मी कार्यालयीन कामानिमित्त शाळेत जात होते तेव्हा वस्तीतून रस्त्याने शाळेकडे जात असताना ही छोटी छोटी मुलं माझे विद्यार्थी माझ्या गाडीमागे शाळेपर्यंत पळत यायचे. कारण ते नेहमी रस्त्यावर, झाडाखाली,अंगणात खेळत असलेले मला दिसायचे. मॅडम दिसल्या की मॅडम आल्या…मॅडम आल्या म्हणत शाळेकडे पळत यायचे आणि *मला विचारायचे मॅडम आपली शाळा कधी सूरु होणार?* आम्हाला घरी करमत नाही,आम्हाला शाळेतच छान वाटते
तुम्ही आमचे खेळ घेता, अभ्यास घेता,आम्हाला खूप छान वाटते.
त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेपण नव्हते कारण शाळा कधी सुरू होणार हे आजही कोणालाच माहिती नाही.अक्षरक्ष: ती मुले घरी दिवसभर एकटीच असायची. तीसरी व चौथीच्या मुली लहान भावंडाना सांभाळणे, कपडे धुणे,भांडी घासणे,कचरा काढणे इ.कामे करतात. कारण त्यांचे आईवडील सकाळी 6 वाजता कांदाभरणीच्या कामाला जात तर काहींचा व्यवसाय मेंढपाळाचा.. ते मेंढ्यांच्या कळप घेऊन रानात जात तर काहींचे पालक शेतमजुरीसाठी शेतीमध्ये जातात. मग अशा लोकांना सांगू कशी की तुम्ही अँड्रॉईड मोबाईल घ्या. *आपण जेव्हा ग्राउंड लेवलला काम करतो तेव्हाच आपल्याला लोकांच्या अडचणी समजतात*. कारण आपण ते डोळ्यांनी पाहत असतो.शासन स्तरावरून आलेल्या आदेशाचे पालन जरूर केले पाहिजे पण खऱ्या अडचणी जाणूनसुद्धा घेतल्या पाहिजेत.तरच तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचेल आणि मी ते पोहचवल.कारण मी ती परिस्थिती माझ्या शालेय जीवनात स्वतः अनुभवली आहे. माझ्या विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येतात त्या शालेय जीवनात मलाही आल्या होत्या.
15 ऑगस्ट झाल्यावर मी ठरवले की मुलांच्या घरी जाऊन त्यांना शिकवणार* आणि मग कधी 2 तास कधी 3 तास विद्यार्थ्यांच्या घरी जाऊ लागले.15 ऑगस्टपर्यंत अक्षरक्ष: मुलांनी पुस्तकावर नाव सुद्धा टाकले नव्हती.पुस्तकांकडे पाहिल्यावर ती उघडली सुद्धा नसणार अस दिसत होतं.कारण पुस्तकाची छपाई करताना काही पाने एकमेकांना चिकटलेली असतात ती तशीच होती.
16 ऑगस्टपासून मी शाळेत जाऊ लागले आणि आमची शाळा विद्यार्थ्यांच्या अंगणात भरू लागली.कधी झाडाखाली कधी विद्यार्थ्यांच्या ओसरीवर. सगळा अभ्यासक्रम मी पूर्ण करू शकत नव्हते कारण प्रत्येकाच्या घरी मार्गदर्शन करायचे तर पेज टू पेज प्रत्येकाचं नाही व्हायचं तरीही मी मुलांचा पाया पक्का केला तसेच संस्कार आणि योग्य सवयीबाबत मार्गदर्शनही केले.* वाचन,लेखन आणि गणिती क्रिया आणि अंकज्ञान पक्के केले जेणेकरून मुले पुढील इयत्ता गेल्यावर त्यांच्या आधीच्या इयत्तेच्या क्षमता पूर्ण असणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मी सहशालेय उपक्रम राबवले* त्यामध्ये वाचन प्रेरणा दिन,शिक्षण दिन,महात्मा गांधी जयंती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन हे मी झाडाखाली साजरे केले.
त्याचप्रमाणे शासनाचे स्वाध्याय, उपक्रम,गोष्टींचा शनिवार यासाठी मी सर्व मुलांचे रजिस्ट्रेशन माझ्या मोबाईलवर केले आणि प्रत्येकाकडे जाऊन मोबाईलवर स्वाध्यायाचे प्रश्न सोडवून घेतले.
विविध गोष्टी मी माझ्या मोबाईलवर ऐकवल्या. काही दिवसानंतर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला व पालकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या.* मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि उत्साह होता त्यामुळे मला हे सर्व करताना झालेला त्रास आणि कोरोनाची असणारी भीती केव्हा गायब झाली कळलेच नाही.विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी करू शकलो हे आत्मिक समाधान वेगळेच.
ऑनलाईन तासिकेवर आपले पूर्ण नियंत्रण नसते. त्यामुळे सर्वच मुले जॉईन होतील असे नाही,झाली तरी जसे वर्गात लक्ष देतात,दृष्टीक्षेपात असतात तसे ते ऑनलाईन तासिकेला असतील असे नाही.शिवाय नेट्ववर्कचा प्रॉब्लेम असू शकतो,विद्यार्थी वेगळ्या विंडोज ओपन करून पाहत बसतात,अशा अनेक गोष्टी ऑनलाईन शिक्षणात अडथळा ठरतात.
ऑनलाईन शाळेचा अडसर माझ्या शाळेला आला अशा कितीतरी शाळा असतील मग त्या मुलांचे शिक्षण झाले का? हा पण विचार करण्यासारखं आहे.माझे स्टेटसचे फोटो पाहून अनेकांनी कौतुक केले,प्रबलन दिले. तसेच काही शिक्षकांनी यापासून प्रेरणाही घेतली.
‘इच्छा असेल तर मार्ग दिसेल’ या उक्तीप्रमाणे सोशल डिस्टनसिंग पाळून आपण कोणताही उपक्रम साध्य करू शकतो.हे कोविड काळात मला समजलं आणि *फेस टू फेस कम्युनिकेशनची तुलना आपण ऑनलाईन कम्युनिकेशनशी करू शकत नाही. मी तर म्हणेन तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी त्याचा वापर मर्यादित स्वरूपात शिक्षण क्षेत्रात कार्य येईल किंवा तंत्रज्ञांनाची मदत अपरिहार्य कारणासाठी घेता येईल परंतु एका शिक्षकाची जागा ते घेऊ शकत नाही.कारण विद्यार्थी हे शिक्षणाचे हृदय असेल पण शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा आत्मा आहे.
कारण मॅडम उद्या येणार आहेत मग आज दिलेला अभ्यास मुले पूर्ण करू लागली. *माझी मुले ऑफलाईन शिक्षणाने शाळेच्या प्रवाहाने टिकली म्हणून मला ऑनलाईन शिक्षण अयोग्य वाटते.

दयाराणी विलास खरात
‘ श्रमसाफल्य निवास ‘
बिदाल रोड दहिवडी
ता.माण जि.सातारा
मो. नं. 9404631205
खुला गट

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *