जालना (प्रतिनिधी) – भोकरदन शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ असलेले देशी दारुचे दुकान तात्काळ हटविण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन करणार्यावर खोटे गुन्हे दाखल करुन थोर पुरुषांच्या स्मारकाजवळ अवैध धंदे करणार्यावर कारवाई करण्यात यावी तसेच दारुचे दुकान तात्काळ हटवावे अशी मागणी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने करण्यात आली असून जिल्हाभरातुन या संदर्भात निवेदने देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तसेच मुस्लिम समाजाच्या मस्जिद जवळ बेकायदेशीर धंदे सुरु असून त्यांना संबंधीत नगर पालीका अप्रत्यक्षरित्या पाठींबा देत असल्याचा आरोप भारतीय बौध्द महासभेने केला आहे.
भोकरदन नगरपरिषद हद्दीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील तसेच मुस्लिम समाजाच्या मस्जिद जवळ अगदी लगत असलेले देशी दारू विक्रीचे दुकान तात्काळ हटविण्यात यावे यासाठी भोकरदन तालुक्यातील बौद्ध, मुस्लिम व इतर समाजाच्या लोकांनी वेळोवेळी मुख्यधिकारी नगरपरिषद, भोकरदन यांना निवेदन दिले होते, नगरपरिषदेने दारुची दुकान इतरत्र हटविण्यासाठी दि. 07/10/2020 रोजी ठराव क्रमांक.11(2) प्रमाणे घेण्यात आलेला आहे. तसेच दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी नगर पालीकेने ही दुकान इतरत्र हलविण्यासाठी नोटीस जारी केली होती. तरीही दुकान इतरत्र हलविली नाही तसेच नगर पालीकेने देखील कोणतीही कारवाई केली नाही. उलट देशी दारूचे दुकान स्थलांतरित करण्याबाबत निवेदन दिलेल्या धार्मिक, सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे व त्यांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. यांसदर्भात दि. 5 मार्च 2021 रोजी भारतीय बौद्ध महासभा भोकरदन तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यांच्यावरच प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले हा प्रकार गुन्हेगारांना पाठबळ देणार आहे.
त्यामुळे सदरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे व देशी दारूचे दुकान तात्काळ इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे. यासाठी जिल्हाभरात भारतीय बौध्द महासभेच्यावतीने जिल्हाभरातुन प्रशासनाला निवेदने देण्यात आले आहेत. जालना येथे दिलेल्या निवेदनावर भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर, नेते अॅड. कैलाश रत्नपारखी, घनसावंगी तालुकाध्यक्ष मधुकर खरात, बौद्धचार्य लक्ष्मण कोळे, सुनील साळवे यांच्या स्वाक्षर्या आहेत तर मंठा येथुन तालुकाध्यक्ष विष्णु वाघमारे, दत्ता चोरमारे, शहराध्यक्ष अतुल खरात, बौद्धांचार्य महेंद्र टेकुळे, विष्णु वाघ, संदिप सदावर्ते यांच्या वतीने देखील तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच अंबड, घनसांवगी या तालुक्यातूनही प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत.
Leave a Reply