कोल्हापूर : बिबट्याने आतापर्यंत अनेक मानवी वस्तीमध्ये हल्ला केला आहे. जंगलाच्या बाजूला असलेल्या वस्तीमध्ये असे थरारक अनुभव अनेकांनी पाहिले आहेत. शेळी, कुत्रा, इतर जनावरांवरती अचानक हल्ला करुन त्यांना जीवे मारल्याचे आपण असंख्य व्हिडीओ पाहिले आहेत. अशीचं घटना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगिरीच्या जंगलात घडली आहे. डोळ्या देखत मुलीला जंगलात घेऊन जाणारा बिबट्या आईने पाहिला अन् जोराचा हंबरडा फोडला. या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली आहे.
उदगिरी जंगलात केदारलिंगवाडी आहे. वाडीच्या आजूबाजूला पुर्णपणे जंगल आहे. सकाळच्या सुमारास मुलगी आणि आई जंगलात जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले. अधिक जनावरं असल्यामुळे मुलगी एका बाजूला आणि आई एका बाजूला होती. दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मुलीच्या अंगावर जोराची झडप घातली. मुलीच्या गळ्यावर हल्ला केल्यामुळे मुलीचा जागीचं मृत्यू झाला. मुलीचं नाव मनिषा डोईफोडे असं आहे.
मुलीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर बिबट्या तिला खेचून जंगलात घेऊन जात होता. परंतु मुलगी एवढ्या का शांत आहे, म्हणून आई तिला शोधू लागली. त्यावेळी आईने तिला आवाज दिला. परंतु उत्तर देत नसल्यामुळे आईने शोध घ्यायला सुरुवात केली. त्याचवेळी बिबट्या मुलीला जंगलात घेऊन जात असल्याचं दिसून आले.
मुलीच्या आईने आरडाओरड केल्यानंतर बिबट्या मुलीचे मृत शरीर जागीच ठेऊन जंगलात पळून गेला. हल्ला केल्याची माहिती मिळताचं तिथं वनरक्षक आणि त्यांची टीम दाखल झाली होती. जीवघेणा हल्ला झाल्यामुळे परिसरात घबराहट पसरली आहे.