गेल्या काही दिवसांपासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत असून आता भुसावळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खडका रोड परिसरात एका तरुणाची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. तहरीन शेख असे या मृताचे नाव आहे. या घटनेमुळे भुसावळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात असलेल्या अमरदीप टॉकीज जवळील चहाच्या दुकानात तीन ते चार अज्ञातांनी तहरीन शेख या तरुणांवर गोळीबार केला. या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी पोलिसांना फायर करण्यात आलेल्या जवळपास पाच गोळ्या आढळल्या असून गोळीबार करणाऱ्या अज्ञातांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक रावते यांनी दिली आहे. तर पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली आहे का? याबाबत चौकशी केली जात असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेतील आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दरम्यान, भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. भुसावळमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, चाकूने हल्ला, असा गंभीर घटना सातत्याने घडत आहे. भुसावळची गुन्हेगारी थांबवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे का? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे. भुसावळमध्ये गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या गोळीबाराबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे. जिल्ह्यातील गोळीबारांच्या घटनांबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. गोळीबाराच्या घटना जिथे घडत आहेत, तिथे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याबाबत पोलिसांना सूचना करणार आहे. मध्यप्रदेश जवळ आहे. तिथे कमी किमतीत गावठी पिस्तूल मिळतात. त्या घेऊन अनेक तरुण वाम मार्गाला जात आहेत. जे कोणी गोळीबाराचे आरोपी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.