पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा शोध घेण्यात लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे. अपहरण झाल्यानंतर १२ दिवसांनी बालकाचा शोध लागला. या प्रकरण एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. विजय अनंत जयस्वाल आणि सुमन शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
१० डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अडीच वर्षांचे बालक भूपेश भुवन पटेल यांचे अपहरण झाले होते. पटेल दाम्पत्य पुण्यात उदरनिर्वाहासाठी आले होते. मूळचे झारखंडचे असलेले पटेल दांपत्य त्यांच्या मूळगावी झारखंड येथे निघाले होते. पुणे रेल्वे स्थानक परिसरात आरोपी जयस्वाल आणि शर्मा यांनी पटेल दाम्पत्याशी गप्पा मारल्या. त्यांच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर बाळाला खाऊ आणतो, असे सांगून शर्मा आणि जयस्वाल भूपेशला बरोबर घेऊन रेल्वे स्थानकातून पसार झाले.
पटेल दाम्पत्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. शहरातील हाॅटेल आणि लाॅजची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी शहर तसेच परिसरातील २५० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार रांजणगावर परिसरातून अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून अडीच वर्षांच्या बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली.
लोहमार्ग पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख आणि पथकाने ही कारवाई केली.