नागपूर, दि. 27 : नागपूर येथील विधानभवन येथे मध्यवर्ती सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे तसेच मुंबईतील मलबार हिल येथील अजंठा शासकीय निवासस्थान व त्या अखत्यारितील मोकळी जागा ही महाराष्ट्र विधिमंडळास वर्ग करण्याबाबत आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यासंदर्भात पुढील एक महिन्यात कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, नागपूर जिल्हाधिकारी विपिन इटनकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले की, नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशन घेण्यासाठी जागा अपुरी पडते. या ठिकाणी विधिमंडळाची संयुक्त बैठक घ्यायची असल्यास अडचण होते. त्यामुळे येथे मध्यवर्ती सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी बाजूच्याच शासकीय मुद्रणालयाची अतिरिक्त जमीन घेणे प्रस्तावित आहे. ही जमीन अधिग्रहण करण्याबाबत त्वरित आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच मुंबई येथील अजिंठा शासकीय निवासस्थान हे मोडकळीस आले असून या ठिकाणी विधिमंडळ पिठासीन अधिकारी म्हणजेच विधान परिषद सभापती, उपसभापती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते यांच्यासाठी निवासस्थान बांधणे शक्य होईल. ही जागा महाराष्ट्र विधिमंडळास वर्ग करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात पुढील एक महिन्यात योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश श्री. नार्वेकर यांनी यावेळी दिले.