नागपूर, दि.२८ : मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला.
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ते बोलत होते. श्री.फडणवीस पुढे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री व कर्नाटक सरकारला निषेधाचे पत्र पाठविण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असे ठरले होते. आता मुंबईसंदर्भात कर्नाटक सरकारने केले ते दावे बैठकीतील ठरावाच्या विसंगत प्रकारचे दावे आहेत.
सभागृह याचा निषेध करित आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळविले जाईल. केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर जे ठरले आहे त्याचे उल्लंघन करणे हे खपवून घेणार नाही, असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.