उस्मानाबाद जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयाबाहेर खेळत असताना डोक्यात ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने एका ९ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहरांमध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आर्यन अमर नलवडे (वय ९ वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्यन हा वाशी शहरातील एका खासगी हॉस्पिटल समोर खेळत होता. त्यावेळी त्या ठिकाणी ठेवलेले ऑक्सिजनचे सिलेंडर आर्यन याच्या डोक्यात पडले आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
रुग्णालयाच्या समोर ठेवण्यात आलेले ऑक्सिजनचे सिलेंडर अत्यंत बेजबाबदारपणे ठेवण्यात आले होते, असा आरोप करत नातेवाईक यांनी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे.