नागपूर : पालकांना सावध करणारी मोठी बातमी समोर आली आहे. मच्छर मारण्याचं औषध तोंडात गेल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या आशीर्वाद नगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. पालक घरात असताना हा प्रकार घडल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज असल्याचा मुद्दा देखील अधोरेखित झाला आहे.
नागपूर जिल्ह्यातील मन हेलावून टाकणारी ही घटना समोर आली आहे. नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आशीर्वाद नगर परिसरात ही घटना घडली आहे. रिद्धी चौधरी असे या चिमुकलीचे नाव आहे. लहान मुलांकडून खेळताना अनेकदा पैसे किंवा खेळेण्याच्या वस्तू तोंडावाटे पोटात गेल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. रविवारी खेळता खेळात रिद्धीच्या हाती डास पळविण्यासाठी घरात असणारी मशीन लागली. खेळताना मशिन रिद्धीने तोंडात घातले, मशिनमधील लिक्विड तोंडात गेले. त्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती खराब झाली. प्रकृती खराब झाल्यानंतर आईवडिलांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान रिद्धीचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने आक्रोश केला. या मातेचा आक्रोश अक्षरश:काळीज पिळवटून टाकणारा होता.
अनेकदा लहान मुलांना हातात आलेली प्रत्येक वस्तू तोंडात घालण्याची सवय असते. त्यामुळे अनेकदा चुकून एखादी वस्तू गिळली जाते. ज्यात पैशांचे कॉईन, खेळण्याची वस्तू याचा समावेश असतो. त्यामुळे मुलांच्या बाबतीत पालकांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच लहान मुलं खेळत असताना त्यांच्या आजूबाजूला नुकसान होईल अशा वस्तू ठेवू नयेत याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे.