नंदुरबार : ज्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश शासनाच्या वतीने दिले असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
शासनाने जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे. पालकमंत्री डॉ. गावित यांनी तातडीने नंदुरबार तालुक्यातील कढरे, आसाने, वैंदाणे परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आश्वासन दिले.
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे.यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिले. जिल्ह्यातील कढेरे, आसाने, वैंदाने सह जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या क्षेत्रात अवकाळी पाऊस झाला. अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
उत्तर महाराष्ट्रासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने जिल्हयात बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. यावेळी नंदूरबारचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नंदुरबार तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके, कृषी पर्यवेक्षक सुधीर पाटील ,कृषी सहाय्यक सर्वश्री सतीश गिरासे कंडरे, बादल बंजारा, गजानन पाटील, सुवर्ण महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.