मुंबई, दि. ८: बीड जिल्ह्यातील देवस्थानाच्या इनामी जमिनीबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत सखोल तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरु असून याचा तपास लवकर करावा अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
आष्टी तालुक्यातील देवस्थानाच्या इनामी जमिनीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार सर्वश्री जयंत पाटील, रईस शेख, आशिष शेलार, नाना पटोले, दिलीप वळसे-पाटील, प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकरणी मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास पुढील कार्यवाहीबाबत आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढली असल्याने तपास पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. हा तपास लवकर पूर्ण करावा अशा सूचना संबंधित विभागाला देऊन दोषींवर कार्यवाही करण्यात येईल आणि देवस्थानाच्या जमिनी परत देवस्थानाला देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.