मुंबई, दि. ८ : “महाराष्ट्रात महिलांना मानाचे स्थान आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील महिलांना विविध क्षेत्रात अधिकाधिक संधी निर्माण करून देणारे सर्वसमावेशक महिला धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व महिलांना सर्व क्षेत्रात समान तसेच सन्मानाचे स्थान मिळावे, या अनुषंगाने जागतिक महिला दिनानिमित्त उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आधुनिक महिला धोरण तयार करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावरील चर्चेला फडणवीस उत्तर देत होते.
फडणवीस म्हणाले, “आज महिला अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहेत. तथापि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या विविध गटांतील प्रत्येक महिलेचा प्रश्न वेगळा आहे. या सर्वांचा विचार करून आणि संबंधित विविध घटकांशी चर्चा करून महिला धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. यापूर्वी राज्यात तीन वेळा महिला धोरणे राबविली गेली. ती आपापल्या परीने यशस्वी देखील झाली. तथापि कालानुरूप बदल आवश्यक असल्याने येणारे चौथे महिला धोरण आधीच्या धोरणांचा आढावा घेऊन, आजच्या महिलांच्या समस्या सोडविणारे तसेच त्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणारे असेल”.
एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के महिलांचा मानव संसाधन म्हणून विचार होईल, तेव्हाच देशाची खरी प्रगती होईल, या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेनुसार राज्यातही लैंगिक अंतर संपवून सर्वच बाबतीत महिलांना समान स्थान देण्यात येत आहे. जागतिक पातळीवर अनेक देशांच्या तुलनेत याबाबतीत भारत पुढे आहे. देशात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘सुकन्या समृद्धी’ अशा योजनांमुळे महिला अधिक सक्षम होत आहेत. विविध योजनांमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. यापुढे देखील महिलांसाठीच्या विविध योजना राबविण्यात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहील, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
भारतीय संस्कृतीत स्त्रीचे स्थान महत्त्वपूर्ण आणि आदराचे असल्याचा उल्लेख करून श्री.फडणवीस यांनी ‘राजमाता’ ते ‘बीजमाता’ असा पुरातन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या स्त्री गौरवाच्या इतिहासाचा प्रवास कथन केला. स्त्री ही शक्ती असल्याचे सांगून संत मीराबाई, संत मुक्ताबाई, कान्हो पात्रा, जनाबाई, सखूबाई, महाराणी दुर्गवती, राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, राणी लक्ष्मी बाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, रमाबाई रानडे, भारतरत्न लता मंगेशकर, कल्पना चावला, पी टी उषा, मेरी कोम अशा किती तरी महिलांनी आपापल्या काळात अलौकिक कार्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला. भारतीय राजकारणात मंत्री, पंतप्रधान, अध्यक्ष, सभापती, राष्ट्रपती अशी महत्त्वाची पदे महिलांनी सांभाळली व गाजवल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी सध्या केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या निर्णयांची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह सदस्य ॲड.मनिषा कायंदे, श्रीमती उमा खापरे, डॉ.प्रज्ञा सातव, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सर्वश्री अमोल मिटकरी, श्रीकांत भारतीय, अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे, कपिल पाटील यांनी सहभाग घेतला.