जालना (प्रतिनिधी) – केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आणि सामान्य जनता हवालदिल झालेली आहे. युवकांच्या हाताला काम नसल्यामुळे बेसुमार बेरोजगारी वाढल्याने जनतेचे जगणे कठिण झाले आहे. त्यावर आवाज उठविण्यासाठी महाविकास आघाडीची विराट सभा दिनांक 02 एप्रिल रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता मराठवाडा सांस्कृतीक मंडळ मैदान छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पुर्वतयारीसाठी जालना जिल्हा महाविकास आघाडीच्या बैठकीत हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार रोजी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या विराट सभेस राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसनेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आदी महाविकास आघाडीचे नेते मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यातील शासन हे केवळ आरोप प्रत्यारोपाच्या पाठ जनतेसमोर मांडत आहे आणि शेतकऱ्यांचे बेरोजगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. देशात आणि राज्यामध्ये भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड महागाई वाढली आहे. खरं पाहता सरकारने सामान्य जनतेच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे. परंतू तसे होत नसतांनाचे दिसून येत आहे. राज्यातील महाविकास आघाडीने सरकारला जागं करण्यासाठी एकजुट महाविकास आघाडीची विराट जाहिर सभेचे छत्रपती संभाजी नगर येथे रविवार रोजी आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये जालना जिल्ह्यातून तीस हजार कार्यकर्ते रवाना होणार असल्याचे बैठकीत नियोजन करण्यात आले.
या बैठकीत माजी मंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंटयाल, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, अरविंदराव चव्हाण, शिवाजीराव चोथे, चंद्रकांत दानवे, संतोष सांबरे, शिवसनेचे जिल्हा प्रमुख भास्करराव अंबेकर, ए. जे. बोराडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देमशुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, राजेंद्र राख, बबलु चौधरी, बाळासाहेब वाकुळणिकर, शेख महेमूद, रविंद्र तौर, केदार कुलकर्णी, कपिल आकात, जगन्नाथ काकडे आदींनी जाहिर सभेच्या पुर्वतयारीसाठी वेगवेगळ्या सुचना आणि पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पाळण्यात येईल असे सांगुन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाहिर सभेला उपस्थित राहतील अशी ग्वाही यावेळी दिली.
माजी मंत्री राजेश टोपे यांनी बोलतांना सांगीतले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात मोठ्या संख्येने असल्यामुळे महाविकास आघाडीची एकजुटपणे सभेच्या उपस्थितीसाठी यशस्वीरित्या तयारी झाली पाहिजे. छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आपल्या जिल्ह्याला लागून असल्यामुळे जालना जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांची रवानगी झाली पाहिजे असेही यावेळी टोपे यांनी सांगीतले.