उरण (संगिता ढेरे ) – उरण तालुक्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत असून या राष्ट्रीय प्रकल्पा मधून मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण, जल प्रदूषण होत आहे.वारंवार होणाऱ्या जल व हवेच्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शुक्रवार दि 8 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 3 वाजल्यापासून उरण तालुक्यातील पिरवाड समुद्र किनारी कार्यरत असलेल्या ओएनजीसी या राष्ट्रीय प्रकल्पातून मानवी जीवनास तसेच पशु पक्ष्यांसाठी घातक असलेले रसायन सोडण्यात आले.
मांगीण देवी मंदिराला लागून अस लेल्या नाल्याद्वारे ही तेल गळती मोठ्या प्रमाणात झाली.नाल्यावाटे हे घातक केमिकलयुक्त तेल समुद्रात जाउन मिसळले.त्यामुळे अनेक मासे यामुळे मृत्यूमुखी पडले आहेत तर या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात हे रसायन(तेल )गेले असून अनेक शेतजमीन नापीक होउन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.समुद्रात तेल मिसळल्याने मासेमारी व्यवसाय सुद्धा संकटात आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा तेल गळतीमुळे नागाव ग्रामपंचायत व म्हातवली ग्राम पंचायत हद्दीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचविणाऱ्या तसेच स्थानिक भूमीपुत्र असलेल्या मच्छीमार बांधवांचे मासेमारी व्यवसाय व शेतकऱ्यांचे शेती व्यवसाय नष्ट करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या ओएनजीसी कंपनीवर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी स्थानिक मच्छीमार व शेतक-यांनी केली आहे. दरम्यान तेल गळती करून ते साफ करण्याचे कामही ओएनजीसी प्रशासना मार्फत करण्यात आले.समुद्र किनारी व नाल्यात उतरून हे तेल कामगारांनी यंत्र लावून एका टँकर मध्ये भरले आहे. 3 ते 4 टैंकर तेल निघाला. शेकडो लिटर तेल गळती झाल्याने परिसरात उग्र वास पसरले होते.या घटना समजताच नागाव ग्रामपंचायतचे सरपंच चेतन गायकवाड तसेच ग्रामविकास अधिकारी किरण केणी, ग्रामपंचायत सदस्यांनी सदर घटनेची पाहणी केली. सरपंच चेतन गायकवाड यांनी त्वरित गटविकास अधिकारी समीर वठारकर यांना फोन करून कळविले. त्या नंतर पंचायत समितीचे आरोग्य पर्यवेक्षक महेश काळे घटना स्थळी दाखल झाले. तहसीलदार उद्धव कदम यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली . त्यांच्या द्वारेही पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्या द्वारे घटनेची पाहणी करण्यात आले.तहसील कार्यालय, पंचायत समिती वं ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ओएनजीसी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत ग्रामपंचायतने केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्या. या बैठकीत जनतेची, नागरिकांची बाजू घेत तेल गळती व शेतकऱ्यांचे, मच्छिमार बांधवांचे आर्थिक नुकसान बाबत आवाज उठविण्यात आला .यावेळी ओएनजीसी प्रशासनाने नमते घेत सरपंच चेतन गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली. शेतकऱ्यांना व मच्छिमार बांधवांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे व असे तेल गळती परत न करण्याचे आश्वासन ओएनजीसी प्रशासनाने सरपंच चेतन गायकवाड, त्यांचे सहकारी व पंचायत समितीचे आरोग्य पर्यवेक्षक महेश काळे यांना दिले.
गटविकास अधिकारी समीर वठारकर यांनी सूचना केल्याप्रमाणे मी सदर घटना स्थळी प्रत्यक्ष हजर राहून घटनेची जागेची पाहणी केली. सदर घटनेचा अहवाल वरिष्ठांना पाठविणार आहे. तेल गळती मूळे मच्छीमार बांधवाचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या तेल गळती मुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
– महेश काळे , आरोग्य पर्यवेक्षक, पंचायत समिती उरण.
ओएनजीसी कंपनीने अनेकदा खराब तेल नाल्यावाटे समुद्रात सोडले आहे. वारंवार सोडणा-या केमिकलयुक्त तेला मूळे आमची चांगली जमीन खराब झाली आहे. आता कमित कमी 5 वर्षे तरी त्या शेतजमीनीत पिक घेता येणार नाही. याला जबाबदार कोण ? या नुकसानाची भरपाई शासन करणार की ओएनजीसी प्रशासन करणार ? आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
– गणेश थळी, शेतकरी.
ओएनजीसी कंपनीतून झालेल्या तेल गळतीमुळे शेतकरी व मच्छिमार बांधव यांचे जीवन उध्वस्त झाले आहे. पर्यावरणासाठी अत्यंत हानीकारक अशा तेलची गळती झाल्याने त्याचा फटका मच्छीमार बांधव व शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांना तसेच मच्छीमार व्यावसायिकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे.
– चेतन गायकवाड, सरपंच,नागाव ग्रामपंचायत.
नागाव, पिरवाड समुद्रकिनारी ओएनजीसी कंपनीतून मोठ्या प्रमाणात तेल गळती झाली आहे. हे रसायन मानवी जीवनास व समुद्रातील जीवांना धोकादायक आहे.शेती व समुद्रात तेल पसरले आहे.सदर घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.सदर घटनेचा पंचनामाही लवकरच वरिष्ठांना कळविणार आहे.झालेले नुकसान भरपाई शेतकरी व मच्छिमार बांधवाना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.
– किरण केणी, ग्रामविकास अधिकारी,नागाव ग्रामपंचायत.
दिनांक 8 सप्टेंबर रोजी नागाव ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात तेल गळतीच्या विषया संदर्भात ओएनजीसी कार्यालयात दुपारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत असा प्रकार पुन्हा होणार नाही असे आम्ही ग्रामपंचायतला वचन दिले आहे.असा प्रकार अशी घटना पुन्हा होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ.
– एस. के.त्रिवेदी, ऑपरेशन हेड,ओएनजीसी प्रशासन, उरण
नेमकी तेल गळती कशामुळे झाली याचा आम्ही शोध घेउन अशी तेल गळती पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेऊ.शेतकऱ्यांना,मच्छीमारांना नुकसान भरपाई देऊ, तेल गळती होणार नाही याची विशेष खबरदारी घेऊ.
– आर.के. सिन्हा जनरल मॅनेजर,प्रॉडक्शन,ओएनजीसी उरण.