जालना/प्रतिनिधी – लॉ. स्व. स्मिता अरुण मित्तल यांच्या स्मृत्यर्थ लॉयन्स क्लब ऑफ जालनाच्यावतीने दृष्टी रक्षक प्रकल्पांतर्गत आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराचा 130 जणांनी लाभ घेतला. या तपासणीत दोन जणांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून, त्यांच्यावर चिकलठाणा येथील लॉयन्स आय हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
शोला चौकातील राष्ट्रीय हिंदी विद्यालय प्राथमिक विद्यालयात 23 सप्टेंबर रोजी हे शिबिर घेण्यात आले. परिसरातील 130 जणांनी नेत्र तपासणी करून घेतली. लॉ. स्व. स्मिता मित्तल यांच्या स्मृत्यर्थ 23 आणि 24 सप्टेंबर असे दोन दिवस राजीव गांधी मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना मिष्ठान्न जेवण देण्यात येते.
नेत्रतपासणी शिबिर उद्घाटनप्रसंगी बोलताना लॉयन्स क्लबचे अध्यक्ष राजेश लुनिया म्हणाले की, डोळा हा शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. दृष्टी असेल तर जग पाहता येते. त्यामुळे प्रत्येकाने काही दृष्टी दोष असल्यास तात्काळ नेत्र तपासणी करून घेणे गरजेचे आहे. क्लबच्या वतीने महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या रविवारी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना दृष्टी प्रदान करण्यात आलेली असून, शहरी आणि ग्रामीण भागातही शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन राजेश लुनिया यांनी केले.
याप्रसंगी सचिव बळीराम बेंद्रे, कोषाध्यक्ष महेंद्र बाठीया, प्रकल्प प्रमुख डॉ. राजकुमार सचदेव, डॉ. पियूष होलानी, सतीश पित्ती, विनोद शिंगणे, विजय दाड, जयप्रकाश श्रीमाली आणि लॉयन्स परिवारातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.