गोंदिया – मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोदा गावात अवघ्या ६० रुपयासाठी मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्याच्या बोदा गावातील तरुण अल्पेश पाटील (वय, २१) याने आकाश दानवे याला ६० रुपये उधार दिले होते. ते उधारीचे पैसे परत करण्यासाठी अल्पेशने आकाशकडे तगादा लावला होता.
मात्र आकाश त्यास टाळाटाळ करत होता. यावरुनच अल्पेश आणि आकाश या दोघांमध्ये वाद झाला. मारहाण करण्यासाठी अल्पेश पुढे आला असता आकाशला धक्का लागल्याने तो रस्तावर पडला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली व तो बेशुद्ध पडला.
त्यानंतर लगेच त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र दवनीवाडा येथे हलविण्यात आले व तेथून पुढे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. या घटनेची माहिती दवनीवाडा पोलिसांना देण्यात आली आहे. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया सुरू आहे. अवघ्या ६० रुपयांमुळे तरुणाची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.