पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता. दहशतवाद्यांना याबाबत सीरियामधून सूचना मिळत होत्या, अशी खळबळजनक माहिती तपासात समोर आली आहे.
पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याकडून तपासात ही माहिती समोर आली आहे. एनआयएने महम्मद शाहनवाझ आलम याला नुकतीच अटक केली आहे. शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता.
पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात १९ जुलै २०२३ रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर अधिक तपासासाठी पोलिसांनी घराची झडती घेतली या कटाची माहिती समोर आली.