मुंबई – मुंबईत गेल्या काही दिवसांत टीसीला, होमगार्डला मारहाण होण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी चर्चगेट-गोरेगाव लोकल प्रवासादरम्यान एक तरूणीने फर्स्ट क्लासच्या डब्यात महिला टीसीला मारहाण केली. तर त्यानंतर मध्य रेल्वे मार्गावरही एका माथेफिरुने महिला होमगार्डला बदडलं होतं. यातच आता बोरिवली स्थानकातूनही अशीच अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरिवली स्थानकात एका टीसीला बेदम मारहाण झाल्याचे वृत्त आहे.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरूणीला रोखले म्हणून त्या तरूणीने, तिच्या मित्रासह मिळून टीसीला बेदम चोप दिला. बोरिवली स्थानकात ही खळबळजनक घटना घडली आहे. The NCM India Council for Men Affairs या ग्रुपने X (पूर्वीचं ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर टीसी म्हणून कार्यरत असणारा राहूल शर्मा यांचे सध्या बोरिवली स्टेशनवर पोस्टिंग आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका तरूणीला रोखण्याची त्यांनी (हिंमत!) केली. नियमांचे पालन करत त्यांनी दंड आकारण्यासाठी कारवाई केली. मात्र त्याबदल्यात त्या (रोखलेल्या) तरूणीने तिच्या मित्रासह राहुल यांना मारहाण केली. रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या GRP पोलिसांनीही तिच्याविरोधात काहीच कारवाई केली नाही. रेल्वेला स्वत:च्या अधिकाऱ्यांचेच संरक्षण करता येत नसेल तर ते सामान्य प्रवाशांचे रक्षण कसे करणार ? असा प्रश्न या अकाऊंटवरून विचारण्यात आला आहे.
एफपीजेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या घटनेबद्दल बोरिवली रेल्वे पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्यात आला असतात, तेथील अधिकाऱ्यांनी या घटनेला दिजोरा दिला. मात्र यासंदर्भात अदायाप कोणत्याही पक्षाने औपचारिक तक्रार किंवा एफआयआर दाखल केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बोरिवली स्टेशनवर टीसी आणि एका मुलीने कथितरित्या एकमेकांवर हल्ला केला परंतु शेवटी दोघांनी सामंजस्याने हे प्रकरण सोडवत तडजोड केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वीही मुंबईत टीसीवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एका तरूणीने लोकलमधील टीसीवर हात उचलत तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट-गोरेगाव लोकल प्रवासादरम्यान ही घटना घडली. एका तरूणीने टीसीच्या कॉलरला हात लावला आणि तिला मारहाणही केली. टीसीने तिकीटाची विचारणा केल्यानंतर संतप्त तरूणीने हे कृत्य केल्याचे समोर आले, मात्र त्यामुळे सर्वच प्रवासी हादरले. याप्रकरणी आरोपी तरूणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र या घटनेमुळे टीसींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.