जालना – रेशीम उद्योगातुन दरमहा वेतनप्रमाणे हमखास उत्पन्न मिळते, मनरेगा अंतर्गत एक एकर करीता 3.97 लाख रूपये अनुदान देण्यात येते. जे शेतकरी मनरेगा योजनेस पात्र ठरत नाहीत अशा शेतकऱ्यांना ‘सिल्क समग्र’ या योजनेतून अनुदान देण्यात येते त्यामुळेच आता सर्व वर्गातील रेशीम ऊद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. तरी शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी वेळेत नोंदणी करुन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले.
महारेशीम अभियान अंतर्गत सोमवार दि.27 नोव्हेंबर रोजी शेतकरी चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास नागपूर रेशीम संचालनालय उपसंचालक महेंद्र ढवळे, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, वरीष्ठ क्षेत्र सहायक शरद जगताप, रेशीम रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी भाऊसाहेब निवदे व मोठ्या प्रमाणावर भोगगाव, बाणेदार, शेवता येथील शेतकरी उपस्थित होते.
रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते म्हणाले की, जालना येथील रेशीम कोष बाजारपेठेत इतर जिल्ह्यातील शेतकरी जास्तीचे वाहतूक भाडे खर्च करून कोष विक्री करण्यासाठी येतात असे सांगून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे सांगितले. नागपूर येथून उपसंचालक भोगगावात मार्गदर्शन करणेसाठी आल्यामुळे शासनाने खऱ्या अर्थाने या गावाची दखल घेतली आहे. ऊस पिकातून 18 महिन्यांनी उत्पादन मिळते, रेशीम पिकापासुन शेतकरी दरमहा उत्पादन घेत आहेत. त्यामुळे महारेशीम अभियानांतर्गत दि.20 डिसेंबर 2023 पुर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन केले. रेशीम रत्न पुरस्कार प्राप्त भाऊसाहेब निवदे यांनी रेशीम शेतीतील आपला अनुभव व फायदे सांगितले.
भोगगाव येथील सरपंच ऊध्दव मुळे म्हणाले की, भोगगाव येथील युवा शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता तूती लागवड करून दरमहा कमाई करावी असे सांगितले. माजी सरपंच ज्ञानोबा मुळे यांनी भोगगावमध्ये सर्व शेतकऱ्यांना बारमाही सिंचन सुविधा ऊपलब्ध असून सर्वच शेतकऱ्यांनी तुती लागवड करून जीवनमान उंचवावे असे आवाहन केले. यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष भिमाशंकर मुळे यांनी गावातील लोकांनी तुती लागवड केल्यास ऊत्पादनात वाढ झाल्यामुळे तंटाच राहणार नाही असे मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमास बाणेगावचे सरपंच बालाजी ऊढाण यांच्यासह गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेअरमन रामभाऊ जंगले यांनी केले.