अहमदनगरमधून एक दु:खद घटना समोर आली आहे. सांदण दरी पाहण्यासाठी आलेल्या एका पर्यटक तरुणीचा मृत्यू झालाय. दरी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक तरुणीचा पाय घसरला आणि ती खाली पडली. यात तिचा जागीच मृत्यू झालाय. सदर घटनेमुळे परिसरात एकखच खळबळ उडालाये. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी सकाळी 11 चा सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. ऐश्वर्या खानविलकर (24 वर्षीय) असं या मृत मुलीचं नाव आहे. तरुणी आपल्या मित्रपरीवारासह पर्यटनासाठी आली होती. रविवारची सुट्टी आणि सोमवारी जोडून ख्रिसमसची सुट्टी असल्याने तरुणी आणि तिच्या मित्रांनी बाहेर फिरण्याचा प्लान केला होता. बाहेर फिरण्याचा हा प्लान अशा पद्धतीने फसेल याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.
विकेंडमुळे सध्या भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी आहे. अशात दरी पाहण्यासाठी आलेली ही तरुणी काही अंतरावर आल्यावर घसरून पडली. ती पडली त्यावेळी तिच्या आजुबाजूला तिला पटकन सावरण्यासाठी कोणीच नव्हतं. त्यामुळे ती खोल दरीत कोसळली. बऱ्याच उंचावरून दरीत पडल्याने तिच्या हातापायांना तसेच डोक्याला मोठा मार लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेण्याचं आवाहन आता वनविभागासह पोलिस प्रशासनाने केलं आहे. पर्यटनस्थळी नेहमीच अशा घटना घडत असतात. अशावेळी प्रवास करताना आणि निसर्गाचा आनंद लुटताना प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. थोडे जरी दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा केल्यास व्यक्तींचा जीव जातो. आपल्या ग्रुपमधील आपल्यासोबत खेळणारी, बागडणारी मैत्रीण अशा पद्धतीने या जगाचा निरोप घेईल अशी कल्पनाही या मित्रांनी केली नव्हती. मैत्रिणीच्या निधनाने ग्रुपमधील सर्वच मुला मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 15-15 मिनिटांचा ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.