नागपूर – पैशांच्या व्यहारातून देखील लोकांमध्ये भांडणं होत असल्याच्या घटना नेहमीच घडतात. अनेकदा हे वाद टोकाला पोहोचतात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. योजना करून मित्रांनीच मित्राचा खून केल्याचं समोर आलं आहे. नागपुरात पैशाच्या वादातून सुपारी घेऊन प्रॉपर्टी डीलरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर आरोपी मृतदेह कारमध्ये टाकून पळून गेले होते. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. ही घटना चंपा परिसरातील आहे. चंपा परिसरात चालत्या कारमध्ये तीन जणांनी मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केली. त्यानंतर ते तेथून पळून गेले. हे प्रकरण क्रिकेट सट्टेबाजेशी संबंधित असल्याचं समोर येतंय. मृत तरूण प्रॉपर्टी डिलर होता.
आदित्य बोंद्रे यांची हत्या सचिन फेदरकर (३७ वर्ष), रोशन बोकडे ( ३५ वर्ष) आणि मृणाल भोयल (२६ वर्ष) यांनी केल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, काही वेळातच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तिघांनाही २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनी ही हत्या एसयूव्ही कारमध्ये केली. आदित्य आणि सचिन दोघेही क्रिकेट बेटिंगमध्ये पैसे गुंतवत असत. यावेळी त्यांच्यात पैशांवरून वाद झाला. त्यानंतर सचिनने आदित्यच्या हत्येची योजना आखली. यासाठी रोशन आणि मृणालला सुपारी दिली होती.
ठरलेल्या योजनेनुसार सचिनने आदित्यला भेटायला बोलावले. चौघेही एसयूव्ही कारमध्ये बसले. सचिन आणि आदित्य यांच्यात पैशांवरूनही वाद झाला होता. त्यानंतर सचिन, रोशन आणि मृणाल यांनी आदित्यला चालत्या कारमध्ये बेदम मारहाण केली. त्यानंतर आदित्यचा मृतदेह गाडीत टाकून ते पळून गेले. दुसऱ्या दिवशी पोलिसांना आदित्यचा मृतदेह कारमध्ये सापडल्यानंतर तपास सुरू झाला. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.