नाशिक : एकीकडे राज्यात डॉक्टरांचा संप सुरु असताना नाशकात डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या सुयोग हॅास्पिटलचे संचालकांवर अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाल्यानं डॉक्टरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पालकमंत्र्यांच्या बैठकीत गुन्हेगारी नियंत्रण करण्यासाठी चर्चा झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पोलिसांची दहशत संपली की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. नाशिकमध्ये रात्री उशिरा पंचवटी येथील सुयोग हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी हे गंभीर जखमी झाले आहेत. धारदार शस्त्राने डॉ. कैलास राठी यांच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार करण्यात आले आहेत. सुयोग हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात ही घटना घडली. या घटनेनंतर उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या हल्ल्यानंतर डॉ. राठी यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीतील सुयोग हॉस्पिटलमधील डॉ. कैलास राठीयांच्यावर एकाने प्राणघातकहल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री 9.30च्या दरम्यान घडला. रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी महिलेच्या पतीने आर्थिक वादातून हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ डॉ. कैलास राठी यांचे सुयोग हॉस्पिटल आहे. शुक्रवारी रात्री संशयित आरोपी त्यांना भेटायला आला होता. त्यानंतर आरोपीने डॉ. कैलास राठी यांची भेट यांच्यासोबत चर्चा सुरु केली. मात्र यावेळी शाब्दिक वाद झाले. त्यांनतर आरोपीने डॉ. राठी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. आरोपीने डॉ. राठी यांच्या डोक्यावर व मानेवर 15 ते 16 वार केले आणि तेथून पळ काढला. आरडाओरडा ऐकून हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी राठी यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्यावर कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचार सुरु केले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान, नाशिक शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या डॉक्टरवरील प्राणघातक हल्ल्यानंतर नाशिकमध्ये आज संपूर्ण हॉस्पिटल्सच्या सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. डॉक्टर संपावर जाणार असून निषेध म्हणून त्यांनी हा पवित्रा घेतला आहे. दाखल रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. मात्र नवीन ओपीडी केली जाणार नाही असे आय एम ए नाशिकने कळवले आहे. यावर भूमिका घेण्यासाठी आज दुपारी बारा वाजता सर्व डॉक्टरांची बैठक घेण्यात येणार आहे.